Pune | Fri, 10 October 2025

Ad

आदिवासी विकासमंत्र्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद, उच्च ध्येय गाठण्याचे केले आवाहन

Sunil Goyal | 8 views
आदिवासी विकासमंत्र्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद, उच्च ध्येय गाठण्याचे केले आवाहन

गडचिरोली, दि. ३० जुलै (जिमाका): आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज सेमाना रोड येथील शासकीय इंग्रजी माध्यम आदिवासी आश्रमशाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांना आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याबरोबरच उच्च शिक्षण घेऊन देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. “खूप शिका, मंत्री व्हा, कलेक्टर व्हा,” असे प्रेरणादायी शब्द त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून उच्चारले.

मंत्री डॉ उईके यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना निसर्गाची काळजी घेण्याचा संदेश त्यांनी दिला.

या भेटीदरम्यान, मंत्र्यांनी मुलींच्या वसतिगृहात जाऊन तेथील निवास, भोजन आणि इतर सुविधांची पाहणी केली. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. यासोबतच वसतिगृहात महापुरुषांचे फोटो लावणे, विद्यार्थ्यांसाठी आचारसंहितेचे फलक लावणे, आणि अभ्यागतांसाठी बसण्याची व्यवस्था सुधारित करणे यांसारख्या सूचना दिल्या.

या प्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आदिवासी अपर आयुक्त आयुषी सिंह, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी रणजित यादव, तसेच श्री अशोक नेते, डॉ. देवराव होळी, श्री नामदेव उसेंडी, श्री प्रकाश गेडाम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

0000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp