देशातील विमान वाहतूक क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून दोन नवीन एअरलाईन्सना आवश्यक परवानगी देण्यात आल्याची माहिती माहिती नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली. ‘अल हिंद एअर’ आणि ‘फ्लाय एक्सप्रेस’ अशी या दोन कंपन्यांची नावे आहेत.
सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत स्टार एअर आणि फ्लाय-९१ यांसारख्या लहान एअरलाईन्स आधीच कार्यरत आहेत. आता अल हिंद एअर, फ्लाय एक्सप्रेस आणि शंख एअरमुळे टियर-२ आणि टियर-३ शहरांची हवाई जोडणी अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांना अधिक पर्याय, स्पर्धात्मक भाडे आणि चांगली सेवा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सध्या देशांतर्गत विमानप्रवास करणा-या सुमारे ९० टक्के प्रवाशांकडून इंडिगो आणि टाटा समूहाच्या (एअर इंडिया) सेवांचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत एका मोठ्या एअरलाईनमध्ये अडचण निर्माण झाली, तर संपूर्ण व्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो. ही जोखीम कमी करण्यासाठी सरकारने नव्या एअरलाईन्सना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील सर्वात मोठी एअरलाईन असलेल्या इंडिगोच्या प्रणालीत अलीकडे बिघाड झाला होता. यामुळे संपूर्ण देशाची विमानसेवा विस्कळीत झाली. हजारो प्रवाशांना तासन्तास विमानतळांवर थांबावे लागले, अनेक जण आपल्या गंतव्यस्थानी पोहोचू शकले नाहीत. या घटनेमुळे भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात मोजक्या कंपन्यांचे वर्चस्व किती धोकादायक ठरू शकते, हे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.