वाघोली - दुपारची दोनची वेळ. एक मद्यधुंद तरूण अचानक आव्हाळवाडी रोडवरील एका टॉवरवर चढतो. त्याला बघून हळू हळू गर्दी वाढते. त्याला खाली येण्याची पोलिस, नागरिक व अग्निशमन कर्मचाऱ्यांची विनंती. मात्र कागदपत्रे दाखवा त्याचा हट्ट. अर्धातास गोंधळ.
अखेर तोच खाली येतो. त्याला पोलिस ठाण्यात नेतात. पुन्हा दोन तासाने येऊन तो पुन्हा टॉवर वर चढतो. पुन्हा त्याला उतरविले जाते. नागरिकांसाठी हे मनोरंजन ठरले तर पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी.
अमोल रामदास धोत्रे (वय-३२, रा वाघोली) असे त्याचे नाव. तो वर चढल्यानंतर त्याला पाहण्यासाठी व व्हिडिओ काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडीही झाली होती. पोलिस त्याला खाली येण्यासाठी विनंती करीत होते. अग्निशमन दलालाही बोलविण्यात आले.
मात्र मला कागदपत्रे द्या, असे तो म्हणत होता. जसे जसे त्याला विनंती करत होते. तसा तो वर वर चढत होता. अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. अखेर तोच हळू हळू खाली आला. दोन अग्निशमन कर्मचाऱ्यांनी थोडे वर जाऊन त्याला खाली आणले. त्याला पोलिस ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांनी तेथे त्याचा जबाब घेतला. नंतर त्याला सोडून दिले.
तेथून येताच पुन्हा तो टॉवरवर चढला. पोलिसांना पुन्हा वर चढून त्याला खाली आणावे लागले. अशा या प्रकाराने नागरिकांची चांगली करमणूक झाली. पोलिसांची मात्र खूपच दमछाक झाली. या पूर्वीही तो दोन वेळा टॉवरवर चढल्याची माहिती नागरिकांनी दिली. तो कशासाठी टॉवरवर चढला याचा उलगडा मात्र झाला नाही. कोणी नवरा बायकोचे भांडण झाले म्हणून, तर कोणी त्याला मारले म्हणून चढण्याची चर्चा होती.