पुणे: कोरेगाव पार्क परिसरात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, एकमेकींच्या अत्यंत जवळच्या समवयस्क मैत्रिणींमध्ये झालेल्या वादातून एका तरुणीने आपल्या मैत्रिणीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीच्या हातावर आणि गळ्याजवळ गंभीर जखमा झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र मारहाणीचे कारण ऐकून पोलीसही काही काळ चक्रावून गेले.
या प्रकरणी शितल नावाच्या 29 वर्षांच्या तरुणीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, तिच्या अश्विनी नावाच्या मैत्रिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्क येथील दरवडे मळा परिसरात घडली. (Breaking News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितल आणि अश्विनी दोघीही दरवडे मळा परिसरात जवळच राहतात. दोघीही 29 वर्षांच्या असून नोकरी करतात आणि अनेक वर्षांपासून जवळच्या मैत्रिणी आहेत. अश्विनीच्या घरी लग्नासाठी पाहुणे येणार होते. मात्र अश्विनीला हे लग्न मान्य नव्हते. त्यामुळे तिने शितलला सांगितले की पाहुण्यांना येऊ नका असे सांग. मात्र शितलने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
याच गोष्टीचा राग अश्विनीच्या मनात होता. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दोघींची भेट झाली. यावेळी पुन्हा लग्नाच्या विषयावरून त्यांच्यात वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर अश्विनीने शितलला हाताने मारहाण केली आणि तिचा गळा पकडला. त्यानंतर हातातील चाकूने शितलच्या हातावर आणि गळ्याजवळ वार करून तिला गंभीर जखमी केले.