मुंबई – देवेंद्र फडणवीसांनी विरोधक जे बोलतात ते गांभीर्याने घ्यावे, अन्यथा एक दिवस झारखंडचे पोलीस महाराष्ट्रात येतील आणि तुमच्या एखाद्या मंत्र्याला किंवा खासदाराला अटक करुन घेऊन जातील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. सुमित फॅसिलिटीज कंपनी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशन हे सामाजिक सेवा करण्यासाठी चालवले जात असल्याचे दाखवले जात आहे, मात्र या फाऊंडेशनसाठी आलेला पैसा हा भ्रष्ट मार्गाने येतो आणि समाजसेवेच्या नावाने ब्लॅक मनी व्हाईट केला जातो, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
मुंबईतील रेस्टॉरंट्स शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत मुंबईमध्ये माध्यमांसोबत बोलत होते, यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. सलग दुसऱ्या दिवशी त्यांनी झारखंड मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आलेला सुमित फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक अमित प्रभाकर साळुंखे याचे शिंदे पिता-पुत्रासोबत घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप केला. शिंदे पिता-पुत्रांच्या आशीर्वादानेच सुमित फॅसिलिटीजला मोठमोठी कंत्राटे मिळत होती, या सर्व कंत्राटांची निष्पक्ष चौकशीची मागणी शिवेसना ठाकरे गटाने केली आहे.

