Pune | Fri, 10 October 2025

Ad

आर्टीच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण नोंदणीला २८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Sunil Goyal | 4 views
आर्टीच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण नोंदणीला २८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. २०: अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (आर्टी) राज्यातील मातंग व त्यातील तत्सम जातीच्या उमेदवारांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरिता अनिवासी पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी दिली आहे.

मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी- मांग, मांग- म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग गारोडी, मांग गारुडी, मादगी व मादिगा समाजातील जे उमेदवार १२ वी आणि पदवीधर परीक्षा उत्तीर्ण आहेत अशा पात्र उमेदवारांनी https://barticet.in/ARTI या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन स्वरुपात अर्ज करावेत. २९ ते ३० ऑगस्ट २०२५ या दोन दिवसात उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जात दुरुस्ती व प्रिंट काढण्यासाठी देण्यात आले आहेत. त्यानंतर या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सामयिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test-CET) घेऊन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनामार्फत सर्वंकष धोरण निश्च‍ित करण्यात आले असून त्यानुसार बार्टी संस्थेमार्फत टीआरटीआय, सारथी, महाज्योती, आर्टी या संशोधन संस्थांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांचे संनियंत्रण व अंमलबजावणी बार्टी संस्था करणार आहे.

११ महिन्यासाठी स्पर्धा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण

राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी ११ महिन्यांकरीता यूपीएससी, एमपीएससी राज्यसेवा, अराजपत्रित सेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (एमईएस), न्यायिक सेवा (जेएफएमसी) आणि सहा महिन्यांसाठी बँक (आयबीपीएस), कर्मचारी निवड आयोग (एसएससी), पोलीस- सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण खासगी नामांकित व्यवसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत देण्यात येणार आहे.

प्रशिक्षण कालावधीकरीता विद्यावेतन

प्रशिक्षण कालावधीत दर महिना सहा ते १३ हजार रुपये विद्यावेतन त्यासोबत पुस्तक संच, बुट व इतर खर्चाकरिता एकवेळ १२ ते १८ हजार रुपये अनुषांगिक लाभ देण्यात येणार आहे. त्याकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरुपात अर्ज मागविण्यात येत आहेत.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp