Pune | Fri, 10 October 2025

Ad

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

Sunil Goyal | 7 views
जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

जळगाव दि. १७ (जिमाका):  जळगाव- छत्रपती संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत केली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

पाहणीदरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी आर्किटेक्चरल मॉडेलच्या माध्यमातून मेडिकल हबची सविस्तर माहिती दिली. वैद्यकीय महाविद्यालयासाठी 5,615 चौ.मी. क्षेत्र असून त्यावर 41,622 चौ.मी. बांधकाम करण्यात आले आहे. रुग्णालयासाठी राखीव असलेल्या 5,890 चौ.मी. क्षेत्रावर देखील 41,622 चौ.मी. इतके बांधकाम पूर्ण झाले आहे. तसेच निवासस्थान व वसतीगृहांसाठी 1,14,345 चौ.मी. क्षेत्रात बांधकाम करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर उपमुख्यमंत्री पवार व जलसंपदा मंत्री महाजन यांनी मेडिकल हबमधील इमारतींची पाहणी करून प्रत्यक्ष स्थितीची माहिती घेतली. या वेळी दिसून आलेल्या त्रुटी तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश संबंधित अभियंत्यांना देण्यात आले.

या मेडिकल हबमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संशोधन केंद्र यासह आरोग्यसेवेचे सर्व घटक एकाच ठिकाणी उभारले जाणार आहेत. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी हा या प्रकल्पामागचा उद्देश असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, हा प्रकल्प दीर्घकालीन दृष्टीकोनातून आरोग्य क्षेत्रासाठी “गेम चेंजर” ठरेल.

जळगाव जिल्ह्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असून आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे जिल्ह्याच्या प्रगतीला गती मिळणार आहे. यामुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना पुणे, मुंबईसारख्या महानगरांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही आणि स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp