Pune | Sat, 11 October 2025

Ad

महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एक व्यक्ती अटकेत

Sunil Goyal | 6 views
महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एक व्यक्ती अटकेत

मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाने विनय राजेश पारेख (वय ३७ वर्षे) रा. ए-४०२, कुंज पॅराडाईस, आयआयसीआय बँकेच्या समोर, बडोदा, गुजरात ३९०००२ यास २९.८८ कोटी रुपये इतक्या किंमतीचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) घेऊन करचोरी केल्याप्रकरणी अटक केली आहे.

सदर अटक मेसर्स अॅन्जल प्लाय अॅन्ड लॅम या फर्म मध्ये करण्यात येत असलेल्या पुढील तपासाचा एक भाग आहे. विभागाने अशा करचोरी करणाऱ्या करदात्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे, जे वस्तू किंवा सेवा प्रत्यक्ष न पुरवता बनावट बिले तयार करून आयटीसीचा अवैध लाभ घेत आहेत. हे महाराष्ट्र/केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ अंतर्गत गंभीर स्वरूपाचे उल्लंघन आहे.

विनय राजेश पारेख हे मेसर्स अॅन्जल प्लाय अॅन्ड लॅम या फर्मचे प्रोप्रायटर असून या फर्ममार्फत सुमारे २९.८८ कोटींची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेतला असून आरोपी विनय राजेश पारेख याला अटक करून मा. न्यायदंडाधिकारी एस्प्लेनेड कोर्ट यांच्यासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यास १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सदर कारवाई ही सहाय्यक राज्यकर आयुक्त (डी-३१३) नितीनचंद्र ग. पाटील व सहाय्यक राज्यकर आयुक्त (डी-३१५) रमेश उ. अवघडे यांच्या नेतृत्वाखाली, डीसी-ई-0303 यूनिटच्या राज्यकर निरीक्षकांसह पार पाडण्यात आली.

महाराष्ट्र जीएसटी विभागाने बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. राज्यकर विभाग सर्व करदात्यांना जीएसटी कायद्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करतो आणि कोणत्याही प्रकारच्या करचोरीपासून दूर राहण्याची ताकीद देतो. बनावट व्यवहार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

००००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp