Pune | Fri, 10 October 2025

Ad

महसूल सप्ताहाच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

Sunil Goyal | 9 views
महसूल सप्ताहाच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

परभणी, दि. ०१ (जिमाका): महसूल सप्ताहाच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महसूल सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

महसूल दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात जिल्हा प्रशासनाच्यावतीने कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते, अनिता भालेराव,  उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, जीवराज डापकर, संगीता चव्हाण, शैलेश लाहोटी, तहसिलदार डॉ. संदीप राजापुरे एनआयसीचे देवेंद्रसिंह आदींसह महसूल विभागाचे अधिकारी, कमर्चारी उपस्थित होते.

प्रारंभी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

पालकमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, महसूल विभागामार्फत दि. 1 ते 7 ऑगस्ट 2025  या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहाच्या माध्यमातून नागरिकांसाठी विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आपल्या जिल्ह्यात हा सप्ताह प्रभावीपणे राबवून सर्वसामान्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत विकसित भारत तर त्याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्र-2047 चे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमात आपण सर्वजण सहभागी होवूयात आणि देश व राज्यासह आपल्या परभणी जिल्ह्याला विकासात अग्रेसर करुयात.  महसूल कर्मचाऱ्यांना आपल्या नोकरीच्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा करण्याची उत्तम संधी मिळाली आहे, या संधीचा लाभ घेऊन कर्मचाऱ्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत शासनाचे लोककल्याणकारी उपक्रम पोहोचवून त्यांना योजनांचा लाभ द्यावा. तसेच मुख्यमंत्री यांनी  दिलेल्या दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाची जिल्ह्यात यशस्वीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले.

यावेळी महसूल विभागातील सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी, उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp