Pune | Fri, 10 October 2025

Ad

मराठी भाषा विभागामार्फत ‘अभिजात मराठी, माझ्या अपेक्षा’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा

Sunil Goyal | 7 views
मराठी भाषा विभागामार्फत ‘अभिजात मराठी, माझ्या अपेक्षा’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा

मुंबई, दि. २० : केंद्र सरकारच्या ३ ऑक्टोबर २०२४ च्या अधिसूचनेन्वये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्या अनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित करून ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस तर ३ ते ९ ऑक्टोबर हा कालावधी अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे.

मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा दूत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा जगभरातील १८ ते २१ वयोगटातील मराठी बोलणाऱ्यांसाठी खुली असेल. ‘अभिजात मराठी-माझ्या अपेक्षा’ या विषयावर जास्तीत जास्त तीन मिनिटांचा वेळ प्रत्येक स्पर्धकाला देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे संयोजन ‘ऑगस्ट मीडिया’ या संस्थेतर्फे केले जाईल. ही स्पर्धा ८ ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. महाराष्ट्रातील वेगवेगळे महसूल विभाग तसेच बृहन्महाराष्ट्र मिळून प्रथम नोंदणी करणाऱ्या १००० स्पर्धकांना प्रवेश मिळेल.

स्पर्धकांनी विषयाचे आकलन करून तो विषय आपल्या पद्धतीने मांडणे अपेक्षित आहे. यामधून जास्तीत जास्त १०० उत्तम स्पर्धकांची निवड “मराठी भाषा दूत” म्हणून करण्यात येईल. तसेच, सर्व सहभागींना महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. यासाठी गुगल फॉर्म पाठवण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२५, रात्री १२ पर्यंत आहे.

या स्पर्धेसाठी १८ ते २१ या वयोगटातील युवकांनी ऑनलाईन स्पर्धेमध्ये https://forms.gle/NYvWxvYCSFXCjkzn9 या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन मराठी भाषा विभागातर्फे करण्यात आले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp