Pune | Fri, 10 October 2025

Ad

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मिशन बाल भरारी’ एआय अंगणवाडीचा शुभारंभ

Sunil Goyal | 12 views
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मिशन बाल भरारी’ एआय अंगणवाडीचा शुभारंभ

नागपूर, दि. 27: नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत बालवाडीच्या माध्यमातून लहानपणीच बालमनावर एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, महानगरातील मुलांना ज्या सेवासुविधांच्या माध्यमातून घरच्याघरीच जो विश्वास मिळतो तो विश्वास ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या मुलांनाही मिळावा यादृष्टीने ‘मिशन बाल भरारी’ उपक्रमाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

मेट्रो भवन येथे भारतातील पहिल्या एआय अंगणवाडी उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, प्रविण दटके, संजय मेश्राम, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी व मान्यवर उपस्थित होते.

ही भारतामधील पहिली आगळीवेगळी पायलट योजना असून, अंगणवाडी ताईंना या स्मार्ट साधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘मिशन बाल भरारी’ अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर जिल्ह्यात आणखी 41 एआय अंगणवाड्या सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ग्रामीण आणि शहरी शिक्षणातील दरी मिटवून प्रत्येक मुलाचा उत्साह वाढावा, आनंद आणि कुतूहलाने त्याला शिकता यावे, हा या उपक्रमामागील भावनिक संकल्प आहे. हा संकल्प महाराष्ट्रातील बालशिक्षणामध्ये ऐतिहासिक बदल घडवेल असा विश्वास विनायक महामुनी यांनी व्यक्त केला.

भारताची पहिली एआय-सक्षम अंगणवाडी म्हणून गणना होणाऱ्या  हिंगणा तालुक्यातील वडधामना येथे सुरू करण्यात आलेल्या मुलांना यातून कविता, गाणी आणि अभ्यासक्रम शिकविण्यासाठी व्हिआर हेडसेट्स, एआय-संलग्न स्मार्ट डॅशबोर्ड्स आणि इंटरॅक्टिव्ह डिजिटल कंटेंट यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ही सोय प्रीमियम खासगी बालवाड्यांमध्येही उपलब्ध नाही, असे वैशिष्ट्य या प्रकल्पात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्षयरोगमुक्त नागपूर मोहिमेचा शुभारंभ

नागपूर, दि 27 : संसर्गजन्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षयरूग्णांवर वेळीच निदान आणि वेळीच उपचार झाला तर यातून संसर्गाचा धोका उरत नाही. नागपूर महानगरात उपचारा अभावी कोणताही क्षयरोग रूग्ण राहू नये यादृष्टीने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर वतीने फिरते क्षयरोग निदान व तपासणी केंद्राच्या वाहनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी आमदार प्रविण दटके, डॉ. आशिष देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, दयाशंकर तिवारी, अधिष्ठता डॉ. रवि चव्हाण व मान्यवर उपस्थित होते. नागपूर महानगरातील सुमारे 1 लाख उच्च जोखमीच्या व्यक्तींची या मोहिमेद्वारे तपासणी केली जाणार आहे.

00000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp