Pune | Fri, 10 October 2025

Ad

समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा -पालकमंत्री गुलाबराव पाटील

Sunil Goyal | 6 views
समन्वयाने काम करा, योजनांची गती वाढवा -पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव दि. १८ (जिमाका): पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धरणगाव पंचायत समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल उपस्थित होत्या.

यावेळी पालकमंत्री पाटील यांनी सरपंच व ग्रामसेवकांना आवाहन केले की, जास्तीत जास्त शेत पानंद रस्त्यांचे परिपूर्ण प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठवा. ग्राम रोजगार सेवकांनी आत्मीयतेने काम करून गावोगावी शासनाच्या योजना पोहोचवाव्यात.अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योजनांचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे ही सेवा समजून काम केले पाहिजे. वर्क ऑर्डर झालेल्या कामांना गती देऊन दर्जेदार व मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. शासनाच्या योजनांमध्ये अनावश्यक विलंब होऊ न देता मंजूर प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांचा विश्वास जिंकावा, असे निर्देश त्यांनी दिले.

या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, मोदी आवास योजना, शबरी आवास योजना तसेच जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना आणि पंचायत समिती अधिनस्त असलेल्या सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, डीआरडीएचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी तुषार वानखेडे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानझडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय महाजन, गटशिक्षणाधिकारी भावना भोसले, शेतकी संघ अध्यक्ष गजानन बापू पाटील, संजय महाजन, डी.ओ. पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, पी. एम. पाटील, रवींद्र चव्हाण यांच्यासह तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पाळधी खुर्द ग्रामपंचायतला मिळालेल्या आयएसओ दर्जाबद्दल पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी कैलास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. गटविकास अधिकारी तुषार वानखेडे यांनी प्रास्ताविक केले. विस्तार अधिकारी राजेश इंगळे यांनी आभार मानले.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp