आंबेगाव बुद्रुक ,पुणे-: महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या वतीने वीज वितरण आणि पुरवठा सुरळीत सुरू असताना कोणत्याही प्रकारचे पत्र किंवा याबद्दलचे आदेश आले नसताना देखील अनेक गृहनिर्माण सोसायटी मध्ये जबरदस्तीने टोरांटो या अदानी (खासगी) कंपनीचे मीटर बसवण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
महावितरणचे मीटरच्या जागी आदानी कंपनीचे बसवण्याबाबत कोणताही आदेश नाही तसे परिपत्रक आले नसताना, व याबाबत हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना जबरदस्तीने मीटर बसवण्याचा दबाव सुरू आहे.
या अदानीचे मीटर बसवण्यासाठी महावितरणचे अधिकारी कर्मचारी देखील अदानीच्या मार्फत एक प्रकारे सुपारी उचलण्याचे काम करत आहेत.
आज दत्तनगर आंबेगाव बुद्रुक येथील ऑलिव्ह गृहनिर्माण या नामांकित सोसायटीत मीटर बसवण्यासाठी महावितरणचे आधिकारी येत सोसायटीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला मात्र सोसायटीतील रहिवाश्यांच्या रेट्यापुढे महावितरण चे व टोरांटो अदानी कंपनीच्या मीटर बसवणाऱ्यांना माघार घ्यावी लागली असून खाली हात माघारी फिरावे लागले.
याबाबत एका महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अदानी कंपनीचे मीटर बसल्यावर ग्राहकांना ज्यादाचा आर्थिक भुर्दंड बसत असून यातून दुप्पट तिप्पट वीज बिल येत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच जळालेले मीटर बदलणे, ज्या मीटरची मुदत संपलेली आहे असेच मीटर बदलणे अपेक्षित असताना सरसकट मीटर बदलणे चुकीचे आहे. तसेच मीटर बदलेल्याचा खर्च देखील काही महिन्यानंतर वसूल केले जाणार आहेत. यामुळे ग्राहकांना खासगी अदानी कंपनीची सेवा परवडणारी नसल्याचे नागरिकांचे मत आहे. तसेच खासगी कंपनीचे काहीही इन्फ्रास्ट्रकचर नसताना महावितरण या शासकीय कंपनीच्या बोकांडी खासगी कंपनीचे भूत बसवले जात आहे. आयजीच्या जीवावर बायजी उधार याचा प्रत्यय येत आहे.
याबाबत ऑलिव्ह गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन रवी अक्कलकोटकर यांनी सांगितले की पूर्ववत चांगल्या पद्धतीने सुरू असलेले मीटर बदली करण्याची जबरदस्ती होत असून येथील शाखा अभियंता महाजन सोसायटीमध्ये येऊन जुन्या परिपत्रकाच्या आधारावर मीटर बदलण्यास जबरदस्ती करत आहेत तसेच अडकाठी आणल्यास सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यावेळी सोसायटीच्या वतीने पोलिसांना बोलावल्यावर आणि वरिष्ठाना कळवल्यावर व आमच्या सोसायटीच्या एकजुटीमुळे खासगी कंपनीचे आणि महावितरणचे अधिकारी खाली हात माघारी गेले.
—————————
चंद्रशेखर महाजन शाखा अभियंता आंबेगाव – MSEB चे मीटर च्याच जागी टोरांटो अदानी कंपनीचे मीटर बसवण्या बाबतचे वरिष्ठ पातळीवरून परिपत्रक आले असून त्यापद्धतीने काम सुरू आहे.