Pune | Thu, 09 October 2025

Ad

कृषी विभागाच्या योजनांची माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा –  कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

Sunil Goyal | 15 views
कृषी विभागाच्या योजनांची माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा –  कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे, दि. २२ : शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून कृषी विभागाने त्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती अधिकाधिक गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अशा सूचना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था येथे आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, संचालक अशोक किरनळ्ळी, अंकुश माने तसेच उपसचिव, राज्यातील प्रकल्प संचालक, उपसंचालक, विभागीय सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सहसंचालक व कृषी आयुक्तालयातील कर्मचारी उपस्थित होते.

कृषीमंत्री श्री. भरणे म्हणाले, कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. अधिकाऱ्यांनी योजनांमधील बारकावे लक्षात घेऊन योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळेल याची काळजी घ्यावी. क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन नेहमीच असेल. काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवल्या जातील. परंतु कामात कुचराई करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगून  शेतीमध्ये नावीण्यपूर्ण प्रयोग करण्यासाठीही प्रयत्न करावेत. कृषी विभागाने कुटूंब प्रमुखाप्रमाणे शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर जाऊन  मार्गदर्शन करावे व आवश्यक ती मदत करावी. कोणत्याही योजनेतील निधी व्यपगत होणार नाही याची काळजीही घ्यावी, शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी वाढीव निधीबाबत प्रस्ताव सादर करावा, सन 2023 व 2024 या वर्षातील कृषी पुरस्काराचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रधान सचिव श्री. रस्तोगी म्हणाले, राज्यात कृषी समृद्धी योजना मंजूर करण्यात आली आहे. भांडवली खर्चासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून डीबीटी मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांची निवड करण्याची गरज आहे. प्रत्येक योजनेखाली 31 ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी निवडावेत. त्यामुळे लाभार्थ्यांची प्रतिक्षा यादी संपून नवीन शेतकऱ्यांना लाभ देता येईल. प्राप्त करुन दिलेला निधी वेळेत खर्च करावा. मनुष्यबळ आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या एकत्रिकरणातून कृषी विस्तारासाठी आत्माने काम करावे, असे ते म्हणाले.

आयुक्त श्री. वसेकर यांनी कृषी विभागाची वाटचाल, संरचना, क्षेत्रीय स्तरावरील रचना, मंजूर पदे,मूलभुत पायाभूत सुविधा,कृषी विकास दृष्टीकोन आणि ध्येय, महत्त्वाची पिक क्षेत्र, प्रमुख फळपिके आणि निर्यात, कृषी पुरस्कार तसेच विभागाच्या उल्लेखनीय बाबींची सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.

बैठकीत खतांची उपलब्धता व नियोजन, केंद्र व राज्य शासनाच्या योजना, हवामान केंद्र प्रकल्प, फळपीक व भाजीपाला पिकांचे क्षेत्र व उत्पादन,पीकविमा, अर्थसंकल्पीय तरतूद आदींबाबत माहिती घेऊन प्रशासकीय अडचणी जाणून घेऊन योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या सूचना जाणून घेतल्या. संचालक विनयकुमार आवटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp