Pune | Thu, 09 October 2025

Ad

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणांनी सज्ज रहावे – महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Sunil Goyal | 14 views
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणांनी सज्ज रहावे  – महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि. २६ : येत्या काळात जिल्ह्यात साजऱ्या होणाऱ्या सण, उत्सव व यात्रा प्रसंगी कायदा-सुव्यवस्था व शांतता कायम राखण्यासाठी शहर व ग्रामीण पोलीस यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

पोलीस आयुक्त कार्यालयात पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली शहर व ग्रामीण पोलीस विभागाची आगामी सण उत्सव व यात्रांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अपर पोलीस आयुक्त सर्वश्री वसंत परदेशी, शिवाजी राठोड, राजेंद्र दाभाडे, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

येत्या काळात नागपंचमी उत्सव, नारळी पोर्णिमा, रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, कृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी उत्सव, बैलपोळा, तान्हापोळा, मारबत मिरवणूक उत्सव, गणेशोत्सव आदी सणोत्सव नागपूर शहरात शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस उपायुक्तांनी परिमंडळानुसार शांतता समितीच्या बैठका आयोजित कराव्या. तसेच शहरात कायदा व  सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक सर्व उपाय करण्याच्या सूचना श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिल्या. शहर पोलिसांना आवश्यक अद्ययावत साधन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, कामठी येथील पोलीस भवनासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात पालकमंत्री  श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आगामी सण उत्सव व यात्रेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, पोलीस उपायुक्त सर्वश्री अनिल म्हस्कर, दीपक अग्रवाल, वृष्टी जैन, विजय माहुलकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आगामी सणोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाने केलेल्या नियोजनाची माहिती यावेळी श्री. पोद्दार यांनी दिली. तसेच विभागाकडून राबविण्यात येत असलेला झिरो फॅटॅलिटी प्रोग्राम आणि याअंतर्गत माहिती विश्लेषणासह गुन्हे तपासात आलेली सुकरता, एआयचा करण्यात येत असलेला प्रभावी उपयोग आदींची माहितीही त्यांनी दिली. ग्रामीण भागात अवैध लॉटरी, अवैध वाळू व्यवहार आदींना प्रतिबंध घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश श्री. बावनकुळे यांनी यावेळी दिले. पोलीस स्टेशन परिसरात वृक्ष लागवड करण्याच्या तसेच पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त आणि पोलीस निरीक्षकांनी वेळोवेळी ग्राम भेटींच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याच्या सूचनाही केल्या.

 तत्पूर्वी, महिला व बालकांच्या लैंगिक शोषणा विरोधी आणि मानवी तस्करी विरोधात नागपूर शहर पोलिसांच्या ऑपरेशन शक्ती आणि शक्ती हेल्प डेस्कचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले.

             000000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp