Pune | Fri, 10 October 2025

Ad

नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunil Goyal | 11 views
नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २८ :  नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांनी किशोरवयातच जागतिक बुद्धिबळस्पर्धेत विजेतेपद पटकावले असून ‘ग्रँड मास्टर’ हा  किताब मिळविला आहे, त्यांची ही  कामगिरी अभिमानास्पद असल्याचे सांगून राज्य शासनाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

रामगिरी शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दिव्या देशमुख यांनी भारतीय बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी यांना जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत करून ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. कोनेरू हम्पी यांचे अभिनंदन करत दिव्या देशमुख यांनी दुसऱ्यांदा या स्पर्धेत सहभाग घेत यशोशिखर गाठल्याचे त्यांनी सांगितले. दिव्या देशमुख यांनी वयाच्या १९ व्या वर्षी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत विविध स्पर्धेत २३ सुवर्ण पदकांसह जवळपास ३५ पदके पटकावली आहेत.

दिव्या देशमुख यांच्या या कामगिरीचा राज्य शासनाच्या वतीने सन्मान करण्यात येईल. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

००००००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp