सांगली, दि. २३ (जि. मा. का.) : शेती उत्पादनात वाढ व शेतमाल निर्यातीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल. या अनुषंगाने आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती या विषयावरील कृषि विभागाने आयोजीत केलेला शेतकरी परिसंवाद शेतकऱ्याच्या ज्ञानात भर घालणारा ठरेल. या परिसंवादात वक्त्यांनी सुलभ भाषेत हे तंत्रज्ञान उलगडून सांगावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत कोल्हापूर विभाग व स्व. संभाजीराव पाटील (बापू) प्रतिष्ठान, तांबवे यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ नाका येथे आयोजित शेतकरी परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. इंदिरा पॅलेस, वाघवाडी फाटा येथे आयोजित या कार्यक्रमास आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, सेवानिवृत्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उमेशचंद्र सारंगी, माजी अपर मुख्य सचिव (कृषि) नानासाहेब पाटील, विभागीय कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, युवा संशोधक सारंग नेरकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक चिमण डांगे, राहुल महाडिक, सम्राट महाडिक आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतीचे उत्पादन व शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन प्रयोग करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासन स्तरावर अनेक अनुदान योजना आहेत. शेतकऱ्यांनीही शेतीपूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योग करणे ही काळाची गरज ओळखून त्या दृष्टीने वाटचाल करावी. शेतकऱ्यांचे उत्पादन, उत्पन्न वाढावे, शेतमालास चांगला भाव मिळावा, यासाठी ठिबक सिंचन, शेती व शेतीपूरक उद्योगांना अनुदान देण्याचे शासनाचे धोरण आहे. मक्यापासून 52 प्रकारची उपउत्पादने तयार करता येतात. अशाच पध्दतीने शेतकऱ्यांनी शेतमालाचे उत्पादन करण्याबरोबरच नवनवीन प्रयोग करून शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. 10 ते 15 गावांचे गट करून तेथील प्रगतशील शेतकऱ्यांनी जगभरातील शेती व शेतीमधील बदलाचा, मागणीचा अभ्यास करावा व त्याची स्थानिक स्तरावर अंमलबजावणी करावी, असे ते यावेळी म्हणाले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शहरवाढीची मर्यादा लक्षात घेता, गावातच शेतीमध्ये काळानुरूप बदल करून शेतकऱ्यांनी आत्मनिर्भर व्हावे. नवीन पिके, उपउत्पादने, प्रक्रिया उद्योग यावर शेतकऱ्यांनी भर दिला तरच शेती फायदेशीर ठरेल. प्रक्रिया उद्योगाचे कारखाने खोलून इतरांनाही नोकऱ्या द्याव्यात, असे ते म्हणाले.
आपण मूळचे शेतकरी असल्याचे सांगून त्यांनी उमेदीच्या काळात काजूगर तयार करण्यासाठी केलेल्या प्रयोगाचा दाखला यावेळी दिला.
नानासाहेब पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता पीकपॅटर्नबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा. संरक्षित शेती करावी, फळबागलागवड करावी. शेतीची उपउत्पादने निर्माण करून आत्मनिर्भर व्हावे. तसेच, कुटुंबातील एक सदस्य शिक्षीत करून अकृषिक क्षेत्रात पारंगत करावेत, असे ते म्हणाले.
यावेळी कृषि निर्यात व कृषि व्यापार या विषयावर सेवानिवृत्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उमेशचंद्र सारंगी, केळी निर्यातीवर किरण डोके, डाळिंब उत्पादन व निर्यात याबाबत प्रभाकर चांदणे यांनी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक नानासाहेब पाटील यांनी केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000