मुंबई, दि. १ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात “सणांच्या काळातील अन्न व औषध प्रशासन विभागाची भूमिका व खबरदारी” या विषयावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, दि. 2 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार असून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरदेखील पाहता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR
Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR
YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
सणासुदीच्या दिवसांत नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अन्नधान्य, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ तसेच औषधांच्या दर्जावर कडक नियंत्रण ठेवले जाते. यासाठी शासनस्तरावर ग्राहक जागरूकता मोहीम राबविणे, ग्राहकांना योग्य माहिती देणे, खाद्यपदार्थ खरेदी करताना लेबल, उत्पादन दिनांक व एक्सपायरी तपासण्याचे आवाहन करणे आदी उपाययोजना राबविल्या जातात.
सणाच्या काळात मिठाई व खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होऊ नये, नासधूस झालेल्या पदार्थांची विक्री टाळावी तसेच औषधांचा गैरवापर होऊ नये यासाठी विभागाकडून राज्यभरात सतत तपासण्या घेतल्या जात आहेत. या तपासण्यांसाठी आधुनिक तपासणी प्रयोगशाळांचा वापर करण्यात येतो. दोषींवर कडक कार्यवाही करताना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई, परवाने रद्द करणे, तसेच न्यायालयीन प्रक्रिया सुरू करणे अशा उपाययोजना काटेकोरपणे राबविल्या जात आहे. त्याअनुषंगाने संपूर्ण राज्यात विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमांविषयी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांविषयी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून आयुक्त नार्वेकर यांनी माहिती दिली आहे.
०००