मुंबई, दि. १० : मॉरिशस हा भारतासाठी सर्वाधिक विश्वासार्ह भागीदार असून येथे मोठ्या व्यावसायिक संधी आहेत. भारत-मॉरिशस यांच्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व आर्थिक नातेसंबंध अधिक दृढ करण्याचे आवाहन करुन भारत-मॉरिशस भागीदारी चिरायू होईल, असा विश्वास मॉरिशसचे पंतप्रधान डॉ.नवीनचंद्र रामगुलम यांनी व्यक्त केला.
मॉरिशसचे पंतप्रधान डॉ.नवीनचंद्र रामगुलम यांच्या दोन दिवसीय मुंबई भेटीदरम्यान हॉटेल ट्रायडेंट येथे बिझनेस कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय ऊर्जा, शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह विविध उद्योगसमूहांचे प्रमुख उपस्थित होते. भारतीय विदेश मंत्रालय, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (फिक्की), कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) आणि मॉरिशस आर्थिक विकास मंडळ यांच्यावतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
श्री.रामगुलम यांनी दोन देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करणे, वस्तू आणि सेवांच्या व्यापाराला प्रोत्साहन देणे तसेच परस्पर गुंतवणुकीला चालना देणे या उद्देशाने भारत आणि मॉरिशसदरम्यान झालेल्या व्यापार आर्थिक भागीदारी करारांतर्गत (सीईसीपीए) झालेल्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, २०२४ मध्ये दोन्ही देशांतील व्यापार ८०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स (सहा हजार कोटी रुपये) पर्यंत पोहोचला आहे. मॉरिशसची निर्यात ५० दशलक्ष डॉलर्सवरून १०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगून वित्तीय सेवा, पर्यटन तसेच भारत-आफ्रिका-मॉरिशस त्रिपक्षीय सहकार्याद्वारे व्यापारातील असमतोल कमी करता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. विशेष आर्थिक क्षेत्र उभारण्यास मॉरिशस सरकार कटिबद्ध असल्याचे सांगून हे क्षेत्र भारतीय कंपन्यांसाठी माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, उच्च तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण व मनोरंजन उद्योग यांसारख्या क्षेत्रांत नवे संधी-क्षेत्र ठरेल, असे ते म्हणाले.
डॉ.रामगुलम यांनी जागतिक आर्थिक अनिश्चिततेसह विविध संकटांचा उल्लेख करून भविष्यकाळातील अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी भारत-मॉरिशस परस्पर भागीदारी अत्यावश्यक असल्याचे सांगितले. सागरी अर्थव्यवस्थेतील मासेमारी, समुद्री ऊर्जा व बंदर विकासासाठी त्यांनी भारताच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. भारत व मॉरिशसमधील नाते हे इतिहास, संस्कृती, भाषा, परंपरा व नातेसंबंधाच्या पायावर उभे असून त्यात लोकाभिमुखता व परस्पर आदराचा ठसा उमटलेला आहे. मार्च २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉरिशस भेटीतील ‘मॉरिशस-भारत संयुक्त दृष्टी दस्तऐवजा’चा उल्लेख करत डॉ.रामगुलम यांनी हा दृष्टीकोन सामायिक समृद्धी, शाश्वतता व लवचिकतेवर आधारित असून सरकारसोबत खाजगी क्षेत्रानेही यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. ‘सीआयआय’ आणि ‘फिक्की’च्या आर्थिक योगदानाचे कौतुक करताना या संस्थांनी भारताच्या औद्योगिक बदलात व आर्थिक धोरणांच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगितले.
भारत-मॉरिशस भागीदारीला नवा आयाम – केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर
केंद्रीय ऊर्जा, मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी यावेळी बोलताना भारत-मॉरिशसचे संबंध हे केवळ आर्थिकच नाहीत तर सांस्कृतिक व सामाजिक पातळीवरही अनोखे आणि घट्ट आहेत. भारत-मॉरिशस व्यापक आर्थिक सहकार्य व भागीदारी करारामुळे व्यापार, सेवा, गुंतवणूक व नवोन्मेष यामध्ये नवे मार्ग खुले झाले असून, आज भारत मॉरिशसच्या व्यापार भागीदारांपैकी एक आहे. तसेच मॉरिशस हे भारतातील विदेशी थेट गुंतवणुकीचे एक महत्त्वाचे स्रोत ठरले असल्याचे सांगितले. दोन्ही देशांतील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांना बळकटी देण्याचे आवाहन केले.
मंत्री श्री.खट्टर म्हणाले, भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. गेल्या दशकात भारताने ७ टक्क्यांच्या आसपास वार्षिक वाढ दर कायम ठेवला आहे. ११५ हून अधिक युनिकॉर्न्ससह भारत हे जगातील तिसरे सर्वात मोठे स्टार्टअप इकोसिस्टम आहे, असे सांगून भारत लवकरच पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतातील आधार, युपीआय, डिजीलॉकर यांसारख्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत संरचना जागतिक आदर्श ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
ऊर्जा क्षेत्रातील प्रगती अधोरेखित करुन या क्षेत्रातही भारत अग्रेसर असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतात 100 टक्के ग्रामीण विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. प्रति व्यक्ती वीज वापर वाढून 1395 युनिट्स झाला आहे. नूतनीकरणीय ऊर्जा क्षेत्रात भारताने जुलै 2025 पर्यंत 230 गिगावॅट क्षमता गाठली असून यात सौर ऊर्जा 115 गिगावॅट आहे. 2030 पर्यंत 500 गिगावॅट नॉन-फॉसिल इंधन क्षमता व 2070 पर्यंत नेट झिरो उत्सर्जनाचे लक्ष्य आहे. ग्रीन हायड्रोजन मिशन अंतर्गत 2030 पर्यंत दरवर्षी पाच दशलक्ष टन उत्पादन करण्याचा संकल्प आहे. 2030 पर्यंत या क्षेत्रात 250 अब्ज डॉलर गुंतवणुकीची संधी उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.
देशातील मेट्रो रेल प्रकल्पाच्या प्रगतीवर भर देता मंत्री श्री.खट्टर यांनी 2002 मध्ये दिल्ली मेट्रो सुरू झाल्यापासून आजपर्यंत भारतातील 24 शहरांमध्ये 1,069 किमी मेट्रो नेटवर्क कार्यान्वित झाल्याचे तसेच 949 किमी मेट्रो मार्ग बांधकामाधीन असल्याचे सांगितले. 10 हजार ई-बसेसच्या योजनेला केंद्र सरकारने मंजुरी दिली असल्याचे ते म्हणाले. या क्षेत्रात भारताने मॉरिशसबरोबर भागीदारी केली असून मॉरिशस हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडी व ग्लोबल बायोफ्यूएल अलायन्सचा सक्रिय सदस्य असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारतातील रस्ते, रेल्वे आणि विमानसेवेच्या जाळ्यामुळे गुंतवणुकदारांना अधिक चांगल्या सुविधा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
भविष्यात दोन्ही देशांनी एकत्रितपणे व्यापार-गुंतवणूक, हरित ऊर्जा, डिजिटल सहकार्य, लघुउद्योग आणि स्टार्टअप्स यावर अधिक भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. भारत आणि मॉरिशस यांनी हातात हात घालून दोन शतकांचा प्रवास केला आहे. आगामी काळात हे नाते आणखी दृढ करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे मंत्री श्री.खट्टर यांनी सांगितले.
यावेळी विविध उद्योगसमूहांच्या प्रमुखांनी मनोगत व्यक्त केले.
००००
बी.सी.झंवर/विसंअ/