नवी दिल्ली, दि. 9 : महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार सी.पी. राधाकृष्णन भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदेशात म्हटले आहे की, राधाकृष्णन यांचे जीवन सेवा, समर्पण आणि राष्ट्रहिताप्रती निष्ठेचे प्रतीक आहे. शिक्षण, सामाजिक उत्थान आणि सुशासनातील योगदान प्रेरणादायी आहे. आपल्या अनुभव आणि दूरदृष्टीमुळे भारत नव्या उंची गाठेल आणि जागतिक स्तरावर सशक्त स्थान प्राप्त करेल. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आपले मार्गदर्शन अमूल्य आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राधाकृष्णन यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे की, “ राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. त्यांनी राज्यपालपदाचा गौरव वाढवला. समर्पण आणि विनम्र नेतृत्वाचा हा सन्मान आहे. विकासाची गंगा सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती श्री. सी. पी. राधाकृष्णन यांचे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. त्यांच्या अनुभवाचा देशाच्या लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या सक्षमीकरणासाठी निश्चितच लाभ होईल, असा विश्वास श्री. पवार यांनी व्यक्त केला.
0000