नवी दिल्ली, ५ : महाराष्ट्र सदनात सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीचे उपमुख्यमंत्री परवेश वर्मा यांनी सदनातील ‘ श्री’ दर्शन घेतले. या वेळी निवासी आयुक्त आर. विमला यांनी त्यांचे स्वागत केले. स्वयंसहायता गटातील कारागिरांनी तयार केलेली पारंपरिक शॉल तसेच विविध हस्तनिर्मित उत्पादने त्यांना भेट म्हणून देण्यात आली. वर्मा यांनी हे उत्पादने पाहून समाधान व्यक्त केले आणि स्वयंसहायता गटाच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी उपमुख्यमंत्री वर्मा यांनी दिल्ली सरकारच्या पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, यमुना नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने यंदा गणेश विसर्जनासाठी तब्बल ८५ कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. या उपक्रमामुळे भाविकांना इको-फ्रेंडली विसर्जनाची सोय उपलब्ध झाली असून, नदीच्या संरक्षणास मोठी मदत होईल, असे श्री वर्मा म्हणाले.
आज महाराष्ट्र सदनात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात नांदेड येथील गायक धनंजय जोशी यांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी उपस्थितांची मने जिंकली. श्री वर्मा यांनी या सोहळ्याचा आनंद घेत गणेशोत्सवाचा उत्साह, सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे कौतुक केले.
00000