भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून देशाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या त्रिसूत्रीवर आधारित सामाजिक एकात्मतेचा मूलमंत्र दिला. राज्यघटनेच्या कलम ४६ मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धनाची जबाबदारी राज्यावर सोपवण्यात आली आहे. या दृष्टीकोनातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने विविध योजनांच्या माध्यमातून वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.
सोलापूर जिल्ह्यात समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थ्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी नव संजीवनी ठरली आहे.
शैक्षणिक सक्षमीकरणासाठी योजनांचा आधार
सोलापूर जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात आर्थिक अडथळे येऊ नयेत यासाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबविल्या जात आहेत:
– स्कॉलरशिप योजना: Maha DBT प्रणालीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात निधी जमा केला जातो. सन 2024–25 मध्ये 13,958 विद्यार्थ्यांना ₹24.94 कोटींचा लाभ मिळाला.
– परराज्य शिष्यवृत्ती योजना: परराज्यात शिक्षण घेणाऱ्या 10 विद्यार्थ्यांना ₹26.13 लाखांचा निर्वाहभत्ता.
– राजर्षि शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार: इयत्ता 10 व 12 मध्ये गुणवत्ताधारक 175 विद्यार्थ्यांना ₹8.75 लाखांचे प्रोत्साहन.
– सैनिकी शाळा शिष्यवृत्ती: निवासी सैनिकी शाळांतील 49 विद्यार्थ्यांना ₹7.35 लाखांचा निर्वाहभत्ता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना: शिक्षणासाठी आधारस्तंभ
शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या, परंतु उच्च शिक्षणासाठी इच्छुक असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ही योजना वरदान ठरली आहे. इयत्ता 11वी, 12वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व निर्वाह भत्त्यासाठी ₹43,000 पर्यंतची मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते.
सोलापूर जिल्ह्यातील सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाने या योजनेचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती केली आहे:
– डिजीटल बॅनर व माहितीपत्रके
– आकाशवाणी व नामांकित वर्तमानपत्रांतून प्रचार
– जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये थेट भेटी
या प्रयत्नांमुळे सन 2024–25 मध्ये एकूण 889 विद्यार्थ्यांना ₹3.71 कोटींचा लाभ मिळाला आहे. ही आकडेवारी केवळ आर्थिक मदतीची नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची साक्ष देणारी आहे.
सामाजिक व आर्थिक विकासासाठी महत्त्वाच्या योजना
सोलापूर जिल्ह्यात समाजकल्याण विभागाच्या पुढील योजनाही प्रभावीपणे राबविल्या जात आहेत:
रमाई आवास योजना
269 चौ.फुट जागेत पक्के घर बांधून अनुसूचित जाती व नवबौध्द कुटुंबांना निवारा देण्याचा उद्देश. चालू वर्षात 2,280 घरकुलांना मंजुरी.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना
भूमीहीन व्यक्तींना 100% अनुदानावर जमीन खरेदीसाठी मदत. चालू वर्षात 1 लाभार्थ्याला 0.81 हेक्टर जमीन मंजूर.
तृतीयपंथीय ओळखपत्र वाटप
सामाजिक समावेशासाठी 51 तृतीयपंथीय व्यक्तींना ओळखपत्र व प्रमाणपत्र वितरित.
ऊसतोड कामगार महामंडळ योजना
17 ऊसतोड कामगारांना आर्थिक मदत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना
158 नागरी व ग्रामीण वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी कामांना मंजुरी.
सोलापूर जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाने केवळ योजनांची अंमलबजावणी केली नाही, तर त्या योजनांचा प्रभाव वाढवण्यासाठी जनजागृती, पारदर्शकता आणि सहभाग यावर भर दिला आहे. विशेषतः स्वाधार योजना ही सामाजिक न्यायाच्या मूल्यांना मूर्त स्वरूप देणारी आहे. ही योजना केवळ आर्थिक मदत नव्हे, तर शिक्षणाच्या माध्यमातून स्वाभिमान आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग उघडणारी सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे.
सुनील सोनटक्के
जिल्हा माहिती अधिकारी
सोलापूर