Pune | Sat, 11 October 2025

Ad

कामगार संघटनांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून धोरणात्मक बदल केला जाणार – कामगार मंत्री आकाश फुंडकर

Sunil Goyal | 6 views
कामगार संघटनांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून धोरणात्मक बदल केला जाणार – कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई, दि. 9 : कामगार संघटनांच्या सूचना व मागण्यांचा विचार करून धोरण तयार करण्यात येईल. राज्यातील कामगारांच्या आरोग्य, आर्थिक व कौटुंबिक हितांचा सर्वांगीण विचार करूनच नवे नियम करण्यात येतील, असे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी सांगितले.

भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव ए.आय.कुंदन, कामगार आयुक्त डॉ.तुम्मोड तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कामगार मंत्री ॲड.फुंडकर म्हणाले की, अनेक दशकांपासून असलेले नियम बदलत्या काळानुसार अनुरुप करण्यासाठी सुधारणा आवश्यक असतात. बदल केवळ औपचारिक न राहता ते कामगारांच्या हिताचे व सर्वसमावेशक असले पाहिजे. कामगारांचा प्रतिसाद, सहभाग व सूचना घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येतील.

कामगारांच्या नियमांमध्ये बदल करण्यापूर्वी एसओपी तयार करण्यात येणार असून त्यांचा अभ्यास करण्यासाठी ते कामगार संघटनांना देण्यात येणार आहे. यात कामगारांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न असून कामगारांच्या सामाजिक सुरक्षेपासून ते आर्थिक, कौटुंबिक अडचणींपर्यंत सर्वांगीण विचार करून सकारात्मक व हितकारक बदल नियमांमध्ये केले जातील. तसेच केलेल्या नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी कामगार विभाग प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp