Pune | Fri, 31 July 2026

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणार – मंत्री प्रकाश आबिटकर

Sunil Goyal | 3 views
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणार – मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. ३१ : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका व परिसरातील आरोग्यसुविधा सक्षम करण्यात येणार आहेत. दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, शिरोळ ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन प्रशस्त इमारत, कुरुंदवाड येथे महिला रुग्णालय; तसेच नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे व आरोग्य उपकेंद्रांच्या उभारणीसंदर्भातील प्रस्तावांना गती देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. मुंबईत आरोग्य भवन येथील कार्यालयात आयोजित बैठकीत शिरोळ तालुक्यातील विविध आरोग्यविषयक प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त जगन्नाथ विरकर, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक सुनिता गोलाईत यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी, कोल्हापूर (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, ग्रामीण भागातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक आरोग्य पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यात येत आहेत. दत्तवाड ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून सध्या सुरू असलेल्या ३० खाटांच्या रुग्णालयाचे ५० खाटांत श्रेणीवर्धन होत असल्याने तेथील बांधकामाबाबत प्रस्ताव सादर करावेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अधिक व्यापक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

याशिवाय संभाजीपूर आणि टाकवलीवाडी येथील नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या प्रस्तावांना गती देण्यात यावी. यड्राव येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच लाटवाडी, शिवनाकवाडी, तेरवाड, आगर, कनवाड, खिद्रापूर, बस्तवाड, तामदलगे आणि जैनापूर येथे नवीन आरोग्य उपकेंद्रांचा समावेश करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, “ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. शिरोळ तालुक्यातील प्रलंबित आरोग्यविषयक प्रस्तावांना गती देऊन आधुनिक आरोग्य पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही प्राधान्याने करण्यात येईल. राज्य शासन सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही कमतरता राहू देणार नाही.”

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

आमच्यात सामील व्हा