Pune | Mon, 20 July 2026

Ad

महावितरणकडून वीजचोरांवर कारवाई - १२८१ वीजचोरांवर कारवाई; ८१ लाखांचा दंड

Sunil Goyal | 110 views
 महावितरणकडून वीजचोरांवर कारवाई - १२८१ वीजचोरांवर कारवाई; ८१ लाखांचा दंड

पुणे, : महावितरणकडून वीजचोरांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येतेच. परंतु, मागील पंधरा दिवसांत पुणे परिमंडलात धडक मोहीम राबवून १२८१ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली आहे. या वीजचोरांना ३४०७३० युनिट वीज चोरी केल्यापोटी ८१ लाख ५५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला असून, जे दंड भरणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे महावितरणने सांगितले आहे.

भारतीय विद्युत अधिनियम २००३ अंतर्गत कलम १३५ व १३८ अन्वये मीटरमध्ये फेरफार करुन अथवा वीज यंत्रणेद्वारे थेट आकडा किंवा केबल टाकून वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरण कारवाई करते. तसेच विजेचा वेगळ्या कारणांसाठी वापर केल्यास कलम १२६ अंतर्गत दंड ठोठावण्यात येतो.

महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत वीजचोरांवर धडक मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी संपूर्ण परिमंडलात धडक मोहीम राबविली. ज्यामुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.

रास्तापेठ शहर मंडलात अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या नेतृत्वाखाली १ ते १६ जुलै दरम्यान राबविलेल्या मोहिमेत ३७५ ठिकाणी वीजचोरी आढळून आली. या वीजचोरांनी ९०७९९ युनिटची चोरी केली. त्यापोटी त्यांना २३ लाख ३० हजार ८८० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

पुणे ग्रामीण मंडलात अधीक्षक अभियंता सुरेश सवाईराम यांनी राबविलेल्या मोहिमेत ५८० वीजचोरांवर १३६९३० युनिटची वीजचोरी केल्याप्रकरणी २९ लाख ८२ हजार ६६० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तर गणेशखिंड शहर मंडलात अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी धडक मोहीम राबवून ३२६ वीजचोरांवर कारवाई केली. या वीजचोरांनी ११३००१ युनिटची चोरी केली. त्यांना २८ लाख ४२ हजार १९० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.


 

चालू आर्थिक वर्षांत २२८३ वीजचोरांना ७ कोटी ६१ लाखांचा दंड

 

एप्रिल ते जुलै या महिन्यात पुणे परिमंडलात सातत्याने राबविलेल्या वीजचोरी विरोधी धडक मोहीमेत २२८३ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. या वीजचोरांनी ८७४५५९ युनिटची चोरी केली. महावितरणने त्यांना ७ कोटी ६१ लाख ३१ हजार ६९० रुपयांचा दंड आकारुन अद्दल घडवली आहे.

 

महावितरणचे आवाहन

वीज ही राष्ट्रीय संपत्ती असून, त्याची चोरी करणे कायद्याने गुन्हा आहे. दंडा सोबत कारवासाची तरतूदही वीज कायद्यात आहे. तसेच वीजचोरी करताना जिविताला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी नियमानुसार अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी केले आहे.





Santosh Koli


आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp