मुंबई, दि. ४ : पेसा क्षेत्रातील तेरा जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या १७ संवर्गातील मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्नांना न्याय देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले.
मंत्री डॉ. वुईके यांच्या अध्यक्षतेखाली पेसा क्षेत्रातील मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात बैठक मंत्रालयात घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आदिवासी पेसा जिल्ह्यातील मानधनावरील कर्मचारी उपस्थित होते.
मंत्री डॉ. वुईके म्हणाले, पेसा भरती प्रक्रियेबाबतचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबत दाखल याचिकेच्या निकालाच्या अधीन राहून आदिवासी उमेदवारांना शासनाने मानधन तत्वावर नियुक्ती दिली आहे. न्यायालयीन प्रक्रिया अंतिम होईपर्यंत पेसा क्षेत्रातील नियुक्त्या मानधन तत्वावरच होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भरती प्रक्रियेच्या संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. राज्य जनजाती सल्लागार परिषदेची बैठकही लवकरच घेण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
0000
शैलजा पाटील/विसंअ/