
मुंबई, दि.४ : उरण येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) प्रकल्पातील माथाडी कामगारांच्या रोजगार, कामाचे वाटप तसेच सेवा अटींसंदर्भातील विविध प्रश्नांवर संबंधित सर्व बाबींची नियमानुसार पडताळणी करून न्याय्य व कायदेशीर तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली.
मंत्री फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली उरण येथील बीपीसीएल प्रकल्पातील माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी कामगार प्रतिनिधींनी रोजगार, कामाचे वाटप तसेच स्थानिक माथाडी कामगारांच्या हिताशी संबंधित विविध प्रश्न मांडले.
मंत्री फुंडकर यांनी संबंधित विभागाला प्रकरणातील सर्व बाबींची वस्तुनिष्ठ व सविस्तर पडताळणी करून कायदेशीर चौकटीत न्याय्य निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या. कामगारांचे हित जपणे, रोजगाराची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि औद्योगिक शांतता अबाधित राखणे ही राज्य शासनाची प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही, यासाठी शासन कटिबद्ध असून सर्व संबंधित पक्षांची बाजू ऐकून कायदेशीर तरतुदींनुसार योग्य निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री फुंडकर यांनी सांगितले.
कामगारांशी संबंधित प्रश्न संवेदनशील असल्याने त्यामध्ये पारदर्शकता, न्याय्यता आणि कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोर पालन होणे आवश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी संबंधित सक्षम प्राधिकरणांना प्रकरणाची सखोल तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. राज्यातील माथाडी कामगारांच्या कल्याणासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्या न्याय्य मागण्यांचा सकारात्मक दृष्टीकोनातून विचार केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच.पी. तुम्मोड, उपसचिव स्वप्निल कापडणीस, सहआयुक्त (माथाडी) शिरीन लोखंडे, संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच माथाडी कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
००००
अश्विनी पुजारी/स.सं