नवी दिल्ली, ३ :- गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महाराष्ट्र आणि राज्याबाहेरील मराठीबहुल भागांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. मराठी कला, संस्कृती आणि संगीताचा ठसा देशभर उमटवण्यासाठी तसेच कलाकारांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या कार्यक्रमांची संकल्पना मांडली आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या सांस्कृतिक सोहळ्यांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात येत आहे. दिल्लीसह डेहराडून, बडोदा, बेळगाव आणि गोवा येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
याचाच भाग म्हणून १ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे नागपूर येथील सूर-संगम या संस्थेने गणेशोत्सवानिमित्त संगीतमय प्रस्तुती दिली. सचिन ठोंबरे आणि सुरभी ठोंबरे यांनी संयोजित केलेल्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमात सुरभी ढोमणे (Zee सारेगम फेम, आंतरराष्ट्रीय गायिका) आणि अंबरीश जोगळेकर यांनी आपल्या मधुर गायनाने रसिकांची मने जिंकली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वादक सचिन ढोमणे यांनी संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळली. तर परिमल जोशी, मनोज, सुभाष आणि नविन यांनी उत्कृष्ट संगीत साथ दिली. डॉ. मनोज साल्पेकर यांनी निवेदनाची धुरा सांभाळली, तर ऋषभ ढोमणे यांनी ध्वनी व्यवस्था यशस्वीपणे हाताळली. विविध गाण्यांना प्रेक्षकांनी दाद दिली.
याशिवाय, सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे गणेशोत्सवानिमित्त राज्याबाहेर पाच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. २७ ते २९ ऑगस्ट २०२५ दरम्यान वन संशोधन केंद्र, डेहराडून येथे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले. ३ सप्टेंबर २०२५ रोजी के. एम. गिरी सभागृह, बेळगाव, ४ सप्टेंबर २०२५ रोजी सर सयाजीराव नगर, वडोदरा, गुजरात आणि ५ सप्टेंबर २०२५ रोजी गोवा येथे मराठी बांधवांसाठी सांस्कृतिक सोहळ्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या उपक्रमांमुळे मराठी कला, संस्कृती आणि संगीताचा वारसा देशभर आणि परदेशात पोहोचत असून सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी रसिक प्रेक्षकांना या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र सदन येथे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते २७ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात श्री गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाली. यावेळी निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या मार्गदर्शनाखालीग स्वयंसहाय्यता गटांच्या हस्तकौशल्य दालनाचेही उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्र सदनात उभारण्यात आलेल्या या हस्तकौशल्य दालनाला दिल्लीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून विशेष पाठिंबा मिळत असून, श्री गणेशाच्या दर्शनासाठी अनेकांनी भेट दिली आहे. यामध्ये उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, माजी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रधान सचिव आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम तसेच दिल्लीतील विविध राज्यांचे निवासी आयुक्त यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले.
गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्र सदनात श्रीमती दिपाली काळे यांचा ‘कलारंग’, श्री. देवू मुखर्जी यांचा हिंदी गीतांचा कार्यक्रम, डॉ. पं. संजय गरुड यांचा ‘संतवाणी’, आदिलीला फाउंडेशन आणि रचनात्मक सेवा संगठन यांचा मराठी-हिंदी गीतांवर आधारित नृत्य विष्कार तसेच सचिन ठोंबरे आणि सुरभी ठोंबर यांचा ‘सूर-संगम’चा संगीतमय कार्यक्रम रंगले. या सोहळ्यांमुळे दिल्लीतील नागरिकांना महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि हस्तकौशल्य परंपरांचे दर्शन घडले. हा उत्सव मराठी संस्कृतीचा जागर ठरला आहे.
0000