Pune | Fri, 10 October 2025

Ad

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पादचारी पुलाचे उद्घाटन

Sunil Goyal | 9 views
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पादचारी पुलाचे उद्घाटन

पुणे, दि. १: पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ यांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या पादचारी पुलाची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि आदर्श असून हा स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. पुलामुळे पेठेतील नागरिकांना मेट्रोने प्रवास करण्याची चांगली सुविधा निर्माण झाली आहे, असे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

पुणे मेट्रोच्‍या टप्पा १ अंतर्गत वनाझ स्थानक ते रामवाडी या मार्गादरम्यान डेक्कन जिमखाना आणि छत्रपती संभाजी उद्यानाला पेठ भागाशी जोडण्यासाठी दोन पुलांचे नियोजन करण्यात आले होते. यापैकी छत्रपती संभाजी उद्यान ते शनिवार पेठ या पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले आहे. या पुलामुळे मुठा नदीच्या पलिकडे शनिवार पेठ, नारायण पेठ आणि परिसरातील नागरिकांना छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानकात येणे सुलभ होणार आहे.

भारतातील पहिला ७० डिग्री कललेला काँक्रीटचा पायलन या पुलामध्ये आहे. उच्च तणावक्षमता असलेल्या २० केबल्स पुलाचा भार उचलण्यासाठी बसविण्यात आला आहे. पुलाची एकूण लांबी १७९. ७९१ मीटर तर रुंदी ८ मीटर आहे.  या पुलाची रचना अत्याधुनिक ‘केबल स्टेड ब्रिज’ या तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आली आहे.

या पुलासाठी नदीपात्रात केवळ दोन खांब उभारण्यात आल्याने नदीच्या प्रवाहाला अडथळा होणार नाही. पादचारी पुलाजवळ बालगंधर्व रंगमंदिर असल्याने पुण्याच्या सांस्कृतिक वारशाला अनुसरून पुलाची रचना तानपुऱ्यासारखी करण्यात आली आहे. पुलामध्ये अभियांत्रिकी आणि कलेचा उत्तम संगम साधण्यात आला आहे.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp