यवतमाळ, दि. ४ ; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाला चालना मिळेल. ग्रामीण जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज येथे केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा बळवंत मंगल कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजू तोडसाम, आमदार किसनरावजी वानखेडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी अमित रंजन, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी जालिंदर आभाळे,विशाल जाधव, सर्व गटविकास अधिकारी, सहाय्यक अधिकारी व सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी आणि ग्रामविकासात लोकसहभाग निर्माण करण्यास नवी ऊर्जा निर्माण करण्याचे काम हे अभियान करेल, असा विश्वास मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी व्यक्त केला.
गावोगाव अभियान यशस्वीरित्या राबविण्यात येऊन पंचायतराज संस्था सक्षम करण्यात योगदान देण्याचे आवाहन आमदार श्री. तोडसाम यांनी केले. अभियानाबाबत अधिकाधिक जनजागृती व लोकसहभाग मिळविण्याचे आवाहन आमदार श्री. वानखडे यांनी केले.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन झाले. श्री. पत्की यांनी योजनेचे सादरीकरण केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी आभार मानले.
000000