Pune | Fri, 10 October 2025

Ad

सेवेतील पोलीस शिपायांना पीएसआय होण्याची विभागीय परीक्षेद्वारे संधी

Sunil Goyal | 5 views
सेवेतील पोलीस शिपायांना पीएसआय होण्याची विभागीय परीक्षेद्वारे संधी

मुंबईदि. ४ : राज्याच्या पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक अर्थात पीएसआय पद महत्त्वाचे आहे. या पदाला मोठी प्रतिष्ठाही आहे. त्यामुळे राज्यातील अनेक तरूणांचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेद्वारे सरळ सेवेने पीएसआय होण्याचे स्वप्न असते. या स्पर्धा परीक्षेद्वारे पीएसआय होण्याची संधी न मिळाल्यास पोलीस दलात शिपाई पदावर भरती होऊन विभागीय परीक्षेद्वारे पीएसआय पदावर जाण्याची महत्वांकांक्षा स्पर्धा परीक्षा देणारे उमेदवार बाळगून असतात. मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे पीएसआय होण्याची संधी पुन्हा एकदा सेवेतील पोलीस शिपायांना मिळणार आहे. राज्य शासनाने मर्यादित विभागीय परीक्षा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून सेवेतील पोलीस शिपायांना पीएसआय होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची पदे यापुढे सरळसेवेने ५० टक्केमर्यादित विभागीय परीक्षेद्वारे २५ टक्के आणि २५ टक्के पदोन्नतीने भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे सेवेतील पोलीस शिपायांच्या अनुभवाचा लाभ पीएसआय पदावर कार्यरत असताना होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सांभाळताना अनुभव खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे अनुभवी पोलीस शिपाई पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) होतील. राज्यात संवेदनशील पोलीस ठाण्यांच्या पीएसआय पदाची जबाबदारी अनुभवी पोलीस शिपाई यांना विभागीय परीक्षेद्वारे मिळाल्यास तेथील शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांचा अनुभव निश्चितच उपयोगात येणार आहे. 

या मर्यादित विभागीय परीक्षेसाठी सद्य:स्थितीत पोलीस शिपाईपोलीस नाईकपोलीस हवालदारसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले कर्मचारी पात्र असणार आहेत. संबंधित कर्मचाऱ्याने इयत्ता १० वीची परीक्षा किंवा राज्य शासनाने मान्यता दिलेल्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला असेलतर ज्या वर्षी परीक्षा घ्यायची आहेत्या वर्षाच्या १ एप्रिल रोजी किमान सहा वर्षाची आणि इयत्ता १२ वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला असल्यास ज्या वर्षी परीक्षा घ्यायची आहेत्या वर्षाच्या १ एप्रिल रोजी किमान पाच वर्षाची अखंडीत नियमित सेवा पूर्ण केलेली असावी. तसेच पदवी परीक्षा किंवा राज्य शासनाने मान्यता दिलेल्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झाला असल्यास परीक्षा घ्यायची असलेल्या वर्षी १ एप्रिल रोजी अखंडीत नियमित सेवेची चार वर्ष पूर्ण केलेली असावी.

या परीक्षेसाठी कर्मचाऱ्याचे संबंधित परीक्षा वर्षाच्या १ एप्रिल रोजी वय ३५ वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांच्याबाबत वयोमर्यादेत पाच वर्षाची शिथीलता असणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज सादर करताना दक्षतेच्या दृष्टीकोनातून कर्मचाऱ्याविरूद्ध कोणतीही विभागीय चौकशीफौजदारी कारवाई सुरू नसावी. कर्मचारी कार्यरत असलेल्या कार्यालयाला तशा पद्धतीने प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेमध्ये लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी परीक्षा यांचा अंतर्भाव असेल. त्यासाठीचे गुण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा निश्चित केले जाणार आहेत. या परीक्षेची गुणवत्ता यादी लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांची बेरीज करून तयार केली जाईल. या परीक्षेमुळे सेवेतील कार्यरत पोलीस शिपायांना पोलीस उपनिरीक्षक होण्याची संधी मिळणारएवढे मात्र निश्चित.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp