
मुंबई, दि. ४ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणी पुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासह पाणी पंपांच्या वीज देयकात बचत करण्यासाठी प्रस्तावित १५०० केव्हीए क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून एक महिन्यात सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी पाणीपुरवठा योजना (टप्पा-२) तसेच या योजनेच्या वीज खर्चात बचत करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावासंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस आमदार दीपक केसरकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव ए.नायक, वित्त विभागाचे सह सचिव डॉ माधव वीर,पाणी पुरवठा विभागाच्या सह सचिव गीता कुलकर्णी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कोकण विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, नाबार्ड चे वरिष्ठ महाव्यवस्थापक अविनाश सेवलकर, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री पाटील म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाबरोबरच स्थानिक नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता ही योजना महत्वपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर नाबार्डच्या सहाय्यक महाप्रबंधकांनी संबंधित विभाग आणि वित्त विभागामार्फत सविस्तर प्रस्ताव शासनास सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
मंत्री पाटील म्हणाले, वेंगुर्ला ते चिपी परिसर सागरी किनारपट्टीचा असल्याने गोड्या पाण्याची उपलब्धता मर्यादित आहे. त्यामुळे या परिसरातील विविध ग्रामपंचायतींनी तिलारी प्रकल्पाच्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी घेण्याची तयारी दर्शविली असून त्यासंदर्भातील ठराव व प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. भविष्यात चिपी विमानतळाचा विस्तार झाल्यास पाण्याची गरज आणखी वाढणार आहे. या योजनेची अंमलबजावणी झाल्यास स्थानिक नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याबरोबरच पर्यटन आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे. तसेच पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून शासनाला पाणीपट्टीच्या स्वरूपात महसूलही प्राप्त होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे योजनेची प्रत्यक्ष पाहणी करून सर्व तांत्रिक, आर्थिक व प्रशासकीय बाबींचा समावेश असलेला सविस्तर अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे निर्देश मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण प्रकल्पावरून दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करण्याची योजना प्रगतीपथावर आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील दोडामार्ग ते वेंगुर्ला पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात वेंगुर्ला ते चिपी विमानतळापर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी ७८ कोटी ४६ लाख रुपये निधीची आवश्यकता आहे. तसेच तिलारी प्रकल्पावर आधारित पाणी पुरवठा योजनेतील पाणीपंपांचा वीज खर्च कमी करण्यासाठी १५०० केव्हीए क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याकरिता १२ कोटी २५ लाख रुपये निधी आवश्यक आहे. ही दोन्ही कामे यापूर्वी पाणीपुरवठा विभागाकडे प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने ही कामे अन्य योजनेतून, विशेषतः नाबार्डअंतर्गत प्रस्तावित करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
वेंगुर्ला ते चिपी पाणीपुरवठा योजनेमुळे सागरी किनारपट्टी भागातील सुमारे ४० महसूली गावांना तसेच चिपी विमानतळाला मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे. सध्या या परिसरात विविध हॉटेल, पर्यटन आणि व्यावसायिक प्रकल्प उभारले जात असून भविष्यात या प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासणार आहे.
०००००
मोहिनी राणे/स.सं.