Pune | Fri, 10 October 2025

Ad

यापेक्षा आणखी कोणता वाईट अनुभव लोकांनी दुय्यम निबंधक कार्यालयाकडून घ्यावा – महासंवाद

Sunil Goyal | 12 views
यापेक्षा आणखी कोणता वाईट अनुभव लोकांनी दुय्यम निबंधक कार्यालयाकडून घ्यावा – महासंवाद




  • सावनेर येथील दुय्यम निबंधक श्रेणी-१ या कार्यालयाला अचानक भेट देऊन केलेल्या पाहणीत अधिकारी कर्मचारी गैरहजर
  • दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश

नागपूर,दि. २९ : जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुलभपणे पार पाडता यावेत यासाठी महसूल, नोंदणी व मुद्रांक विभागांतर्गत तालुका पातळीवर दुय्यम निबंधक कार्यालयाद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधांना अधिक पारदर्शी करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेळोवेळी दिले आहेत. याबाबत संबंधित कार्यालय प्रमुखांनी अधिक सजगता दाखवत कार्यालयीन कामकाजात सुधारणा करण्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. दिनांक 28 ऑगस्ट रोजीच्या धापेवाडा दौऱ्यात त्यांनी सावनेर येथील दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालयाची अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत कार्यालयातील केवळ एक कंत्राटी व्यक्ती हजर असल्याचे पाहून “यापेक्षा आणखी कोणता वाईट अनुभव लोकांनी दुय्यम निबंधक कार्यालयाकडून घ्यावा” असा उद्विग्न सवाल त्यांनी केला. त्यांच्या समवेत इतर ओळखपत्र नसलेल्या खासगी व्यक्ती कार्यालयीन कामकाज करत असल्याचे त्यांच्याच तोंडी  ऐकून त्यांनी राज्याचे नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांना दूरध्वनीवर संपर्क साधला. संबंधित अधिकाऱ्यांविरुध्द तत्काळ कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले.

पालकमंत्री बावनकुळे यांनी आपल्या 28 ऑगस्ट रोजीच्या नियोजित  धापेवाडा, कळमेश्वर दौऱ्यात वीज पडून मृत्यू पावलेल्या पाटील व पराते कुटुंबियांची घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली. त्यांच्या समवेत आमदार डॉ. आशिष देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे  व पदाधिकारी सोबत होते. सांत्वनपर भेट झाल्यानंतर त्यांनी सकाळी 10 नंतर सावनेर येथील दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालयास थेट भेट देऊन पाहणी केली.

पाहणी करताना त्यांनी कार्यालयातील हजेरीपट व इतर कार्यालयीन दस्त मागविले. हजेरीपटावर ऑगस्ट महिन्यातील हजेरी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावर कर्मचाऱ्यांची नावे आणि स्वाक्षऱ्या नव्हत्या. ज्या व्यक्तींचा कार्यालयाशी कोणताही अधिकृत संबंध नाही, असे अनधिकृत लोक कार्यालयात मुक्तपणे वावरताना आढळल्याने त्यांनी या भेटीत उपस्थित असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांना नियमानुसार कारवाई  करण्याचे जागेवरच आदेश देवून अनधिकृत असलेल्या व्यक्तीचे जबाब घेण्यास सांगितले.

कार्यालयाशी संबंधित काम असलेले काही नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी दुय्यम निबंधक यांच्या कामकाजासंदर्भात तक्रारींचा पाढाच मांडला. कार्यालयातील सेवांची गुणवत्ता, कारभारातील पारदर्शकता आणि वागणुकीबाबत नागरिकांनी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केल्या. त्यांची कैफियत ऐकून पालकमंत्री श्री बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे यांना नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्याचे आदेश दिले. आम्ही दोषींविरुध्द तत्काळ कारवाई करु असे त्यांनी सांगितले.

सावनेर येथील दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालयात चार पदे मंजूर असून शिपाईचे पद रिक्त आहे. एक लिपीक  पद मंजूर असून दुय्यम निबंधक एस. एस. जाधव रजेवर असल्याने त्यांच्या पदाचा कार्यभार लिपीकाकडे देण्यात आला आहे. एक संगणक ऑपरेटर खासगी तत्वावर कार्यरत आहे.

०००







आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp