Pune | Thu, 09 October 2025

Ad

 ‘इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरणामुळे महाराष्ट्रात उद्योजकांसाठी पोषक वातावरण — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sunil Goyal | 6 views
 ‘इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरणामुळे महाराष्ट्रात उद्योजकांसाठी पोषक वातावरण — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ : राज्य शासन ‘इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरण राबवित आहे. या माध्यमातून गुंतवणुकदारांच्या समस्या निकालात काढण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे महाराष्ट्रातील गुंतवणूक फायदेशीर आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य असून दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. शिक्षण क्षेत्रातही विविध देशातील उत्कृष्ट विद्यापीठांसोबत भागीदारी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार होत आहे. राज्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हॉटेल ताज पॅलेस येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ब्रिटिश शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील गुंतवणूक वातावरण, पायाभूत सुविधा आणि भावी विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली.

ज्याप्रमाणे लंडन म्हणजे युकेची ओळख आहे, त्याचप्रमाणे मुंबई म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे भारत अशी ओळख असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरणामुळे उद्योग परवाने मिळविण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे. गुंतवणूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात आली असून दर महिन्याला त्याचा आढावा घेतला जातो. राज्यात उद्योग, वित्त, शिक्षण, नगरविकास आणि तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रांत गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

देशाच्या शिक्षण क्षेत्रात नवे धोरण राबविले असून परदेशी विद्यापीठांसाठी प्रवेशद्वार खुले केले आहे. त्या अंतर्गत राज्यात नवी मुंबई येथे ‘एज्यु सिटी’ उभारण्यात येत आहे, ज्यामध्ये लंडन विद्यापीठाचा कॅम्पस असणार असून येथे दोन हजार विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय केली जाणार आहे. नवी मुंबई विमानतळ, सी-लिंक आणि ‘तिसरी मुंबई’ या प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यात आधुनिक शहरी विकास होत आहे. वाढवण बंदर विकसित केले जात असून याठिकाणी बुलेट ट्रेन स्थानक आणि ग्रीन इंडस्ट्रियल झोनच्या माध्यमातून हा परिसर ‘चौथी मुंबई’ म्हणून विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर हे ईव्ही हब बनत आहे, नागपूर सोलर मॉड्यूल उत्पादन केंद्र बनत आहे, तर पुणे हे उद्योगांचे प्रमुख केंद्र आहे. महाराष्ट्र देशातील स्टार्टअप्स आणि गुंतवणुकीत आघाडीवर आहे. इन्फ्रास्ट्रक्चर विकासामुळे भारत आज गुंतवणूक स्नेही देश बनला असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनात पारदर्शकता वाढल्याचे नमूद केले. ‘स्ट्रीट व्हेंडर्स’नी डिजिटल व्यवहार स्वीकारले आहेत. जगातील सर्वाधिक डिजिटल व्यवहार भारतात होत आहेत, याचे श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आहे, २०३० पर्यंत ५० टक्के पुनर्वापर ऊर्जा वापराचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्रात सौर ऊर्जेला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यात डेटा सेंटर, एआय आणि क्वांटम टेक्नॉलॉजीसाठी पुण्यात विशेष व्यवस्था उभारली जात आहे. स्किल विद्यापीठांमार्फत एचपी सारख्या आंतरराष्ट्रीय भागीदारांबरोबर तज्ज्ञ घडविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. फिनटेक आणि फायनान्स कंपन्यांचे माहेरघर म्हणजे मुंबई आहे. ब्रिटन आणि भारतातील भागीदारी आणखी दृढ व्हावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

ब्रिटिश शिष्टमंडळातील सदस्यांनीही महाराष्ट्रातील वेगाने वाढणाऱ्या उद्योगक्षेत्राबद्दल समाधान व्यक्त केले. एआय आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली. राज्यात सुरू असलेल्या विकासकामांचे कौतुक करून राज्यात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचेही उपस्थित सदस्यांनी सांगितले.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp