Pune | Tue, 17 February 2026

Ad

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Sunil Goyal | 1 views
आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई, दि. १६ : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पुण्यातील संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे मनपा आयुक्तांना दिले.

पहलगाम हल्ल्यानंतर या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील जगदाळे कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे आणि मुलगी आसावरी जगदाळे यांचे सांत्वन करून या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी आसावरीला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी आसावरी हिला बोलवून तिच्याशी बोलून तिच्या शिक्षणाला समकक्ष असे पद महानगरपालिकेत निर्माण करून तिला सेवेत सामावून घेण्याचे निर्देश दिले. तसेच शासन सहानुभूतीपूर्वक हा निर्णय घेत असून विशेष बाब म्हणून तिच्या नेमणुकीला मंजुरी देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यानुसार लवकरच आसावरी जगदाळे हिला शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याची प्रकिया पूर्ण केली जाणार आहे.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp