मुंबई, दि. ०६ : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणारी सर्व कामे वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.
निर्मल भवन, नरिमन पॉईंट येथील ‘एमएसआरडीसी’ कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, ‘एमएसआरडीसी’चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सहसंचालक मनूज जिंदल, तसेच भू-सर्वेक्षण विभागाचे महाव्यवस्थापक रामदास खेडेकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, नागरिकांच्या सोयीसाठी आणि वाहतुकीच्या सुलभतेसाठी काटेकोरपणे कामे करावीत. प्रकल्पाच्या गतीमध्ये दिरंगाई चालणार नाही. प्रत्येक प्रकल्पाच्या तांत्रिक आणि भौगोलिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला असून या कामांमुळे अंतर कमी होणार आहे. वेळ आणि इंधनाची बचत होऊन प्रवास सुखकर होण्यास मदत होणार असून यासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणीसाठी करण्याचे निर्देश राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.
बैठकीत रेवस-रेड्डी राष्ट्रीय महामार्गातील गुहागर तालुक्यातील १३ ते १५ कि.मी रस्त्याचे पुनःसर्वेक्षण व फेररचना, विरार-अलिबाग महामार्ग, नाशिक शहर वर्तुळाकार रस्ता (रिंग रोड) तसेच भंडारा-गडचिरोली द्रुतगती महामार्ग या प्रकल्पांच्या प्रगती अहवालाचे सादरीकरण करण्यात आले.
०००
राजू धोत्रे/विसंअ/