मुंबई, दि. ९ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के इतकी मानधन वाढ देण्यात येणार आहे. याबाबत शासन मान्यता देण्यात आली असून, राज्यभरातील पन्नास हजार (५०,०००) कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत असून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचे कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत विविध पदावर कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची मानधन वाढीची मागणी होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने १५ टक्के मानधन वाढ देण्याचा निर्णय केला आहे.
आरोग्य यंत्रणा राबवण्यामध्ये एनएचएम कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले. १० वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, एनएचएम कर्मचाऱ्यांना इएसआयएस अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणे, कर्मचाऱ्यांसाठी गंभीर आजार, अपंगत्व, मृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एनएचएम कर्मचारी कल्याण निधी उभारणे, अति दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करणे, यासह इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, याबाबत कार्यवाही सुरू आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक परिणामकारक होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी व्यक्त केला आहे.
सद्यस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. माहे जून २०२५ च्या देय मानधनावर मानधन वाढीची गणना करण्यात येणार आहे.
000
संजय ओरके/विसंअ/