मुंबई, दि. 7 : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षातर्फे राबविण्यात आलेल्या ‘नमो नेत्र संजीवनी अभियानाचा’ समारोप झाला. या अभियानाद्वारे अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर नागरिकांना नेत्र आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आलेल्या अभियानाचा समारोप 2 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आला. या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान राबविण्यात आले. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील एकूण 12,764 रुग्णालयांनी अभियानात सहभाग नोंदवला. या कालावधीत 10,720 नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये एकूण 5,16,752 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.
बहुतांश लोक नेत्र तपासणीकडे दुर्लक्ष करतात. डोळ्यांच्या आजारांची लक्षणं दिसेपर्यंत अनेकदा उशीर झालेला असतो. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राबविण्यात आलेले ‘नमो नेत्र संजीवनी अभियान’ हे जनजागृती व प्रत्यक्ष आरोग्यसेवेचे प्रभावी उदाहरण ठरले आहे. अल्प कालावधीत लाखो नागरिकांपर्यंत मोफत तपासणी व उपचार सेवा पोहोचविण्यात या अभियानाने यश मिळवले आहे. ग्रामीण व शहरी भागातील लोकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही या उपक्रमाची सर्वात मोठी ताकद ठरली असल्याचे मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.
अभियानादरम्यान तपासण्यात आलेल्या नागरिकांपैकी 36,388 रुग्णांना द्वितीय स्तरीय निदानात्मक तपासण्या, उपचारात्मक सेवा (मोतीबिंदू शस्त्रक्रिया किंवा इतर नेत्र विषयक शस्त्रक्रिया) करिता संदर्भित करण्यात आले. तसेच 2,44,788 नागरिकांची चष्म्यासाठी नोंदणी करण्यात आली. पैकी 1,55,372 नागरिकांना चश्मे वाटप करण्यात आले.
या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात 32,911 मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच 4,652 इतर नेत्र विषयक शस्त्रक्रिया (मोतीबिंदू व्यतिरिक्त) यशस्वीरीत्या पार पडल्या.
0000