मुंबई, दि. ८ : नंदुरबार जिल्ह्यातील सिकलसेल, थॅलेसेमिया, ॲनेमिया व लहान बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हाभर प्रभावीपणे तपासणी व उपचार मोहीम राबवून राज्यात सिकलसेल निर्मूलनाचे नंदुरबार मॉडेल विकसित करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्यसेवा आयुक्तालय येथे आयोजित बैठकीत दिले.
राज्यातील नंदुरबार, गडचिरोली, चंद्रपूर, पालघर व नाशिकसारख्या आदिवासीबहुल व दुर्गम भागांमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला असून, नंदुरबार जिल्ह्यापासून या अभियानाची सुरवात झाली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्यसेवा आणि आजारांची वास्तव स्थिती जाणून घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी नुकतीच नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागाला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली होती.
त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी व उपाययोजना याचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (SHSRC) संस्थेच्या संयुक्त समितीद्वारे पाहणी करण्यात आली. या अभ्यास समितीने पाहणी अहवाल बैठकीत आरोग्यमंत्र्यांना सादर केला. सादरीकरणात आरोग्य विषयक अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदविण्यात आली.
यावेळी आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संकल्पित ‘ॲनेमियामुक्त भारत अभियान’ सर्वत्र प्रभावीपणे राबवावे. जिल्ह्यात आवश्यकतेनुसार PPP तत्वावर आरोग्य केंद्रात सेवा उपलब्ध करून द्याव्यात. बाह्य स्रोताद्वारे दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांचे काटेकोरपणे निरीक्षण करावे. आरोग्य संस्थांमधील शासकीय प्रयोगशाळा सक्षम कराव्यात.
आदिवासीबहुल भागात स्थानिक भाषेत आरोग्य योजनांच्या प्रचार व प्रसाराचे साहित्य तयार करण्यात यावे. कालबद्ध नियोजन करून तपासणी मोहिमेची गती वाढवा. आवश्यकतेनुसार जिल्ह्याच्या आकृतीबंधात सुधारणा करून पदनिर्मिती करावी. कुपोषणग्रस्त बालकांसाठी पोषण पुनर्वसन केंद्र वाढवणे गरोदर महिलांसाठी नियमित आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
०००
राजू धोत्रे/विसंअ/