मुंबई, दि. ९ : आदिवासी समाजाच्या चालीरीती, बोलीभाषा, राहणीमान, उत्पन्नाचे स्त्रोत यावर विस्तृत संशोधन होणे गरजेचे आहे. या संशोधनाच्या आधारे समाजाच्या अंतिम घटकाच्या कल्याणासाठी योजना राबविण्यास मदत होईल. त्यामुळे आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (टीआरटीआयची) आदिवासी समाजाच्या संशोधनावर भर द्यावा, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके यांनी दिले.
‘टीआरटीआय’ च्या सक्षमीकरणासाठी सबंधित संवर्गातील अधिकारी नियुक्त करावे. संशोधन शाखेला बळकट करण्यासाठी मानववंशशास्त्रज्ञ तसेच या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची नियुक्ती करावी. आदिवासी समाजातील महापुरुषांचा इतिहास शेवटच्या समाजाच्या विद्यार्थ्याला माहिती होण्यासाठी महापुरुषांवर आधारित पुस्तकांची निर्मिती करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
मंत्रालयात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेबाबत बैठक झाली. बैठकीस विभागाचे सचिव विजय वाघमारे, ‘टीआरटीआय’ च्या आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, सहसचिव श्री. शेळके, संस्थेच्या सहसंचालक चंचल पाटील, उपसंचालक श्री. फिरके, प्रशासकीय अधिकारी कैलास खेडकर आदी उपस्थित होते.
आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके म्हणाले, आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांच्या फलनिष्पत्तीसाठी मूल्यमापन करण्यात यावे. आदिवासी समाजातील संशोधनावर आधारित विविध प्रकाशने तीन किंवा सहा महिन्यांच्या अंतराने नियमितपणे प्रकाशित करण्यात यावी. ‘टीआरटीआय’ अंतर्गत असलेल्या आदिम जमाती कक्षामध्ये समाजातील संपूर्ण जातींचा समावेश करून या जातींसंदर्भात संशोधन करण्यात यावे.
अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समित्यांचे बळकटीकरण करण्यात यावे. समित्यांमध्ये वकिलांची संख्या वाढविण्यात यावी. प्रलंबित शैक्षणिक प्रकरणातील जुनी प्रकरणे मोहीम स्वरूपात निकाली काढावी. आदिवासी समाजाच्या वसतीगृहांमधील वॉर्डन्सना प्रशिक्षण देण्यात यावे. प्रशिक्षणाचे वार्षिक वेळापत्रक तयार करावे. अनुसूचित जमाती प्रवर्गातील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फिलोशीप नियमितपणे देण्यात यावी. आदिवासी समाजासाठी कार्य केलेल्या सर्व महान व्यक्तींची जयंती, शहीद दिनाची माहिती संकलित करण्यात यावी. या महापुरुषांची जयंती आदिवासी विकास विभागामार्फत साजरी करण्यात यावी, असेही आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके यांनी सांगितले.
0000
नीलेश तायडे/विसंअ/