मुंबई, दि. ४ : अभिजात मराठी आणि ऑनलाईन मराठी या दोन्हींच्या संगमातून मराठी भाषेचे भविष्य घडणार आहे. बदलत्या काळात तंत्रज्ञानाचे भान ठेवून भाषेचे अस्तित्व टिकवणे आणि तिचा अभिजातपणा जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले.
अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित ‘ऑनलाईन मराठी : स्थिती व गती’ या परिसंवादात ते बोलत होते. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे आयोजित या परिसंवादाचे अध्यक्षपद माधुरी यादवडकर यांनी भूषविले. तर श्रीमती मंजुषा वैद्य, प्रसाद शिरगावकर, श्रीपाद ब्रह्मे, संजय देशपांडे, सुनील खांडबहालेख, निलेश छडविलकर, चिन्मय गव्हाणकर या तज्ज्ञ विचारवंतांनी परिसंवादात मते व्यक्त केली.
सचिव डॉ. किरण कुलकर्णी म्हणाले की, अभिजात मराठी आणि आधुनिक ऑनलाईन मराठी यांचा परस्पर संबंध समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. अभिजात भाषा म्हणजे केवळ प्राचीन नव्हे, तर तिचा प्रभाव आजही संस्कृतीवर दिसून येतो. भाषा ही सतत बदलणारी, गतिशील गोष्ट आहे. मराठी ही 216 बोलीभाषांचा संगम आहे. या सर्व बोलींनी मिळून प्रमाण मराठी आकाराला आली आहे.
डॉ. कुलकर्णी यांनी भाषेच्या सांस्कृतिक प्रभावाबद्दल सांगितले की, एखादे व्यंगचित्र जरी भाषेशिवाय असले, तरी त्यातील आशय, पेहराव आणि संस्कृती जर मराठीपणाने ओतप्रोत असेल, तर ते मराठीतील व्यंगचित्र ठरते. म्हणजेच भाषेचा प्रभाव फक्त शब्दांपुरता नसून, तो दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही स्वरूपात जाणवतो.
आता डिजिटल युगात हीच परंपरा पुढे नेण्यासाठी ऑनलाईन मराठी बळकट होणे अत्यावश्यक आहे. फक्त शब्दलेखन समावेश करणे किंवा भाषांतर ॲप तयार करणे म्हणजे भाषेचा विकास नसून भाषेचा गाभा, तिचे अभिजातपण आणि तिची भावनिक ताकद ऑनलाईन माध्यमात उतरवणे ही खरी जबाबदारी आहे. मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून प्रथमच या क्षेत्रातील अग्रगण्य तज्ञ एकत्र आले आहेत. ही गोष्ट भाषेच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले.
भाषेचा विकास म्हणजे समाजाचा विकास – माधुरी यादवडकर
मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि समाजातील सर्व घटकांची सक्रीय भागीदारी आवश्यक असल्याचे प्रतिपादन परिसंवादाच्या अध्यक्ष माधुरी यादवडकर यांनी व्यक्त केले.
श्रीमती यादवडकर म्हणाल्या की, भाषा ही फक्त लिहिलेली किंवा बोललेली नसते, ती आपल्या देहबोलीत, संस्कृतीत आणि जीवनशैलीत रुजलेली असते. भाषांतर म्हणजे फक्त शब्दांचे रूपांतर नव्हे, तर त्या भाषेच्या भावविश्वाचे जतन करणे होय. डिजिटल माध्यमांचा वापर आणि नव्या पिढीसमोर मराठी भाषेतील व्यवसाय, रोजगार आणि नवीन संधी मांडण्याचे आवाहन त्यांनी केले. मराठी भाषेकरिता ऑनलाईन व्यवसायाच्या प्रचंड संधी आहेत. अनेक व्यावसायिक आज डिजिटल मराठी माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल करत आहेत. हे सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यादवडकर म्हणाल्या की, मराठी भाषा विभागाने लोकांपर्यंत मराठी भाषेकरिता व्यवसाय संधींची माहिती पोहोचवावी, प्रशिक्षण आणि आर्थिक सहकार्याच्या माध्यमातून तज्ञ तयार करावेत. भाषा केवळ शिकण्यापुरती न राहता ती उपजीविकेचे साधन बनावी, हीच खरी गरज आहे. मराठी भाषा ज्ञानभाषा, अर्थभाषा आणि राजभाषा बनावी, हे आपले सामूहिक स्वप्न आहे. तंत्रज्ञान आणि समाज यांचा संगम घडला, तर हे स्वप्न साकार होणे शक्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या परिसंवादात तज्ज्ञांनी मराठी भाषा संवर्धनासाठी डिजिटल माध्यमांवर भर देण्याची गरज व्यक्त केली. मराठी भाषेचे अभिजातपण, भाषा वृद्धीसाठी मराठीचे ऑनलाईन होणे गरजेचे आहे. नवीन पिढीने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून वाचन केले पाहिजे. मराठी कविता, मराठी शब्दकोष, मराठी साहित्य इंटरनेटवर सहज उपलब्ध झाले पाहिजे. वैविध्यपूर्ण मराठी किबोर्ड तयार करण्यासाठी आग्रह धरावा, असेही मत यावेळी व्यक्त केले. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मराठी मजकूर अधिक असण्यासाठी मराठी माणसांनी आग्रही असण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्ताने आयोजित परिसंवादात मराठी भाषा विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, विभागाचे अधिकारी, कर्मचारी व मराठीप्रमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००
श्री. संजय ओरके/विसंअ/