Pune | Thu, 09 October 2025

Ad

अभिजात मराठी भाषा परिषद देशाच्या दृष्टीने महत्त्वाची – मंत्री डॉ. उदय सामंत

Sunil Goyal | 6 views
अभिजात मराठी भाषा परिषद देशाच्या दृष्टीने महत्त्वाची – मंत्री डॉ. उदय सामंत

 अमरावती, दि. ०६ : प्रत्येक भाषेने आपली अस्मिता उभी केली आहे. त्यामुळे ही अस्मिता अखंडपणे पुढे न्यायची असल्यास देशातील अभिजात भाषेचे महत्त्व अधोरेखित करावे लागणार आहे. त्यामुळे अमरावती येथील पहिली अभिजात मराठी भाषा परिषद देशाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे, असे मत मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभिजात मराठी भाषा परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या निमित्ताने डॉ. सामंत यांनी भेट दिली. यावेळी मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवळगावकर, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, मधुकर जोशी आदी उपस्थित होते.

मंत्री डॉ. सामंत म्हणाले, परिषदेच्या निमित्ताने देशभरातील विद्वान एकत्रित झालेले आहेत. त्यांच्या ज्ञानाने अभिजात भाषांना नवी दिशा मिळणार आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थाने 11 अभिजात भाषांचा संवाद होत आहे. अखंड भारतात विविध बोलीभाषा बोलल्या जातात. त्याचे रूपांतर बोलीभाषेत होते. असाच प्रकार कोकणी भाषेबाबत झालेला आहे. प्रत्येक भाषेचा सन्मान व्हावा, मातृभाषा ही अभिमानाची असून ती बोलता आली पाहिजे, भावना कळल्या पाहिजे.

अभिजात भाषा परिषद ही विद्यार्थ्यांसमोर होणे गरजेचे आहे. यातून त्यांना भाषेची ताकद कळली असती. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अध्ययन केंद्र स्थापन करून मराठी अजरामर झाली आहे. येत्या काळात विविध भाषांमध्ये चांगले साहित्य भाषांतरीत व्हावे, यासाठी अनुवाद समिती स्थापन करण्यात येणार आहे. आज तंजावर सारख्या भागात मराठीचे अस्तित्व आहे. त्यामुळे 400 वर्षानंतरही या ठिकाणी भाषेचे अस्तित्व टिकून आहे. त्यामुळेच मराठीला अग्रक्रम आहे. तंजावर सारख्या राज्यामध्ये मराठी भाषा भवन बांधण्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिलेली आहे. या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. तंजावर सारखी अस्मिता आपणही उभी केली पाहिजे. अभिजात भाषांचे कार्य अखंडपणे पुढे न्यावे, यासाठी कर्तव्य म्हणून चांगले नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp