मुंबई, दि. ०६ : मराठी व उर्दू साहित्यिक देवाणघेवाणीसाठी सांस्कृतिक केंद्रे म्हणजे उर्दू घर योजना आहे. हे उर्दू घर अद्ययावत बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील. तसेच उर्दू शाळा, वसतिगृहे वाढविण्यासाठी सकारात्मक असल्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. उर्दू साहित्य अकादमीची नवीन समिती लवकरच गठित करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
महाराष्ट्र उर्दू साहित्य अकदमीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वरळी डोम येथे आयोजित तीन दिवसीय साहित्यिक व सांस्कृतिक सोहळ्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. द वर्ल्ड ऑफ उर्दू या प्रदर्शनाचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री अनिस अहमद, आमदार सना मलिक, माजी आमदार झिशान सिद्दिकी, पंजाबी साहित्य अकादमीचे अध्यक्ष मार्क सिंह, गीतकार, औकाफ बोर्ड चे अध्यक्ष समीर काझी, पटकथा लेखक जावेद अख्तर, विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, आयुक्त प्रतिभा इंगळे यांच्यासह अधिकारी आणि साहित्यिक उपस्थित होते. यावेळी उर्दू सिखे आणि मराठी शिकूया या दोन पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.
मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींनी समाजउन्नतीसाठी कार्य करताना सर्वसमावेशकता, शिक्षण, भाषेचा विकास आणि संस्कृती संवर्धन यासारख्या मूल्यांची परंपरा निर्माण केली. त्यांच्या विचारांच्या प्रभावामुळेच उर्दूसह सर्व भाषांना महाराष्ट्रात मानाचे स्थान लाभले. या आदर्शांच्या प्रेरणेनेच आज उर्दू भाषेच्या सुवर्ण प्रवासाचा सोहळा होत आहे. उर्दू ही फक्त भाषा नाही, ती संस्कृतीचा सुगंध, विचारांचा सेतू आणि आत्म्याचा आवाज आहे.
अकादमीच्या कार्याबाबत मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, ४५० पेक्षा जास्त साहित्य कार्यक्रम, २५० हून अधिक कवी संमेलने, १५० पेक्षा जास्त कार्यशाळा आणि १०० हून अधिक पुस्तक प्रकाशनांनी उर्दू साहित्याची परंपरा समृद्ध केली आहे. २५ पेक्षा अधिक जिल्ह्यांत अकादमीने कार्यक्रम घेत ग्रामीण भागातील उर्दूप्रेमींपर्यंत साहित्य पोहोचवले. उर्दू ही भारतीय भाषा असून सुमारे सात कोटी लोक ती प्रथम भाषा म्हणून आणि १० कोटी लोक द्वितीय भाषा म्हणून वापरतात. महाराष्ट्रात सात टक्के लोक उर्दू बोलतात, तसेच जवळपास २५ पेक्षा अधिक उर्दू दैनिके कार्यरत आहेत.
उर्दू घर योजनेअंतर्गत नांदेड, मालेगाव, जळगाव, सोलापूर, नागपूरमध्ये उभारणी सुरू आहे. नवोदित लेखक, उर्दू शिक्षक, लेखक, कवी यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. महाराष्ट्रातील १८०० उर्दू शाळात नऊ लाख विद्यार्थांना उर्दू शिकविले जाते. ‘Urdu Learning App’ द्वारे दरवर्षी ५० हजार विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाते. ३ वर्षांत १०० जिल्हास्तरीय साहित्य संमेलने घेतली गेली.
अल्पसंख्यांक महिला व युवकांना प्रशिक्षण, शैक्षणिक प्रोत्साहन देणे अशा अनेक योजना अल्पसंख्यांक विभागाच्या माध्यमातून सुरु आहेत. उर्दू साहित्य अकादमीसह एकूणच अल्पसंख्याक विभागाच्या विविध योजनांसाठी अतिरिक्त विकास निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल.
उर्दू साहित्य कला अकादमीच्या सुवर्णमहोत्सवाचा सोहळा
सचिव रुचेश जयवंशी म्हणाले की, मराठी साहित्याचे उर्दूत आणि उर्दू साहित्याचे मराठीत भाषांतर करून मराठी व उर्दू भाषेतील सृजनशीलता वाढविण्याच्या उद्देशाने माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी १९७५ मध्ये या अकादमीची स्थापना केली. दोन्ही संस्कृतीची आणि साहित्याची देवाण-घेवाण करणे तसेच उर्दू साहित्याचे जतन, संवर्धन करण्यासाठी उर्दू साहित्य कला अकादमी कार्यरत आहे. उर्दुतील नाट्यमहोत्सव, पुस्तके, पत्रकार, ग्रंथालय , लेखक, कवी, यांना प्रोत्साहन देणे हा अकादमीचा उद्देश आहे.
गत चार वर्षातील २०० लेखक, कवी आणि ४८ पुस्तकांच्या लेखकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. पुढील दोन दिवस होणाऱ्या या कार्यक्रमात जास्तीत जास्त उर्दू प्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
अकादमीने मराठी आणि उर्दू या दोन्ही भाषांमधील साहित्यिक संवादाची सशक्त परंपरा घडवली – उपमुख्यमंत्री अजित पवार
या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, उर्दू भाषा ही जगातील सर्वांत सुंदर, भावपूर्ण आणि काव्यात्म भाषांपैकी एक आहे. तिच्या गोडीमध्ये भावना, सुसंस्कृतपणा आणि काव्य सौंदर्य दडलेले आहे.
या तीन दिवसीय सोहळ्यात मुशायरा, गझल, सूफी संगीत, नाट्यप्रयोग, चर्चासत्र आणि पुस्तक प्रदर्शन अशा अनेक आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २०१९ ते २०२३ दरम्यान उल्लेखनीय साहित्यनिर्मिती करणाऱ्या २०० साहित्यिकांचा सन्मान या सोहळ्यादरम्यान होणार आहे.
महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी असली तरीही महाराष्ट्रीय जनतेने मराठी भाषेबरोबरच उर्दू भाषेवरही तेवढेच प्रेम केले आहे. भाषा हे एक संवादाचे परिणामकारक माध्यम आहे. भाषेमुळेच विचारांचे, कल्पनांचे आदान-प्रदान होते.
पन्नास वर्षांच्या या प्रवासात अकादमीने उर्दू साहित्याच्या प्रचार-प्रसाराबरोबरच मराठी-उर्दू संवादाचे नवे आयाम निर्माण केले आहेत. “मीट द रायटर”, नाट्य कार्यशाळा, वाचन उपक्रम आणि अनुवाद प्रकल्पांद्वारे दोन्ही भाषांच्या संस्कृती अधिक जवळ आल्या आहेत.
अकादमीने मराठी आणि उर्दू या दोन्ही भाषांमधील साहित्यिक संवादाची एक सशक्त परंपरा घडवली आहे. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे असे सांगत सर्व उर्दू प्रेमींना सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.
०००
श्रद्धा मेश्राम/विसंअ/