मुंबई, दि. ०६ : अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील एकूण ४९० कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्ती व व्यवस्थापनाचा आढावा घेतला असून, नवीन बंधारे उभारण्यापेक्षा विद्यमान बंधाऱ्यांच्या दुरुस्तीस प्राधान्य द्यावे, अशा सूचना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिल्या.
मंत्रालयात अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीबाबत आयोजित बैठकीत मंत्री संजय राठोड अध्यक्षस्थानी होते. या बैठकीस खासदार अनिल बोंडे, सचिव गणेश पाटील, सहसचिव विजय देवराज, अवर सचिव प्रकाश पाटील, कार्यासन अधिकारी पराग पंडित, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी श्री. निपाणी व जिल्हा जलसंधारण अधिकारी भूपेश दमाहे उपस्थित होते.
मंत्री राठोड म्हणाले की, या दोन्ही जिल्ह्यांतील बंधाऱ्यांची एकत्रित साठवण क्षमता ४८,२३३ सहस्र घन मीटर असून, दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर एकूण १३,४४६ हेक्टर क्षेत्राचे सिंचन शक्य होईल, त्यासाठी ९२ कोटी ७९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पहिल्या वर्षी ३६ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जाईल.
बैठकीत यावेळी खासदार बोंडे तसेच प्रादेशिक व जिल्हास्तरीय यंत्रणेकडून माहिती सादर करण्यात आली. दुरुस्तीत लोखंडी पाट्यांऐवजी हॉट डीप गॅल्व्हनाईज्ड पाट्या बसविणे, निडल्स दुरुस्ती, रबर सील बसविणे अशा घटकांचा समावेश आहे.
अमरावती जिल्ह्यातील ३०० बंधाऱ्यांच्या दुरुस्तीवर ५०.२३ कोटी खर्च अपेक्षित असून, या बंधाऱ्यांची एकत्रित साठवण क्षमता २८,४१९ सहस्र घन मीटर आणि संकल्पित सिंचन क्षमता ८,६७१ हेक्टर आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १९० बंधाऱ्यांच्या दुरुस्तीवर रु. ४२.५६ कोटी खर्च अपेक्षित असून, या बंधाऱ्यांची एकत्रित साठवण क्षमता १९,८१३ सहस्र घन मीटर आणि संकल्पित सिंचन क्षमता ४,७७५ हेक्टर आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
०००
किरण वाघ/विसंअ/