Pune | Thu, 09 October 2025

Ad

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांसाठी उद्योजकता प्रशिक्षण उपक्रम

Sunil Goyal | 4 views
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांसाठी उद्योजकता प्रशिक्षण उपक्रम

मुंबई, दि. ०६ : आर्थिकदृष्ट्या मागास तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी कार्यरत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळने आता बँक कर्जावरील व्याज परतावा (Interest Reimbursement) योजना लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व मार्गदशन देण्याचा उपक्रम सुरू केला असल्याचे  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. मुंबईचे उपमहाव्यवस्थापक आकाश मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

महामंडळाकडून विविध जिल्ह्यांमध्ये तज्ज्ञांच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे महामंडळाच्या माध्यमातून तयार झालेल्या उद्योजकांच्या व्यवसाय वाढीस मदत  होणार आहे. हा उपक्रम  तरुण उद्योजकांना व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये मिळवून देण्याच्या उद्देशाने घेण्यात आला असल्याची माहिती महामंडळाचे  व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली.

या उपक्रमातंर्गत महामंडळाच्या वतीने नुकतेच “पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय” या विषयावर उद्योग-सारथी प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले हाते. त्यात  राज्यभरातील इच्छुक लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. या वेबिनारमध्ये पुणे कृषी विद्यालयाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. माने यांनी दुग्धव्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक बाबींवर प्रकाश टाकला. उत्तम जातीच्या जनावरांची निवड, जनावरांचा आहार, त्यांच्या आरोग्याची काळजी, जनावरांना होणारे आजार आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना याबद्दल सविस्तर माहिती दिली. वेळोवेळी लसीकरण करणे, तसेच आर्थिक नियोजनः दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल, शासनाच्या विविध योजना, तसेच दुधाची विक्री आणि मार्केटिंग, दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि व्यवस्थापन सोपे करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख  याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले.

राज्यभरातून अनेक युवक, महिला उद्योजिका व स्वयंसहायता गटांचे प्रतिनिधी या वेबिनारला ऑनलाईन उपस्थित होते. वेबीनारमधील सविस्तर माहिती महामंडळाच्या @AnnasahebPatilAMUM या YouTube चॅनेलवर उपलब्ध आहे.

०००

वंदना थोरात/विसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp