सिंधुदुर्गनगरीत अनुकंपा नियुक्ती पत्र वितरणाचा ऐतिहासिक सोहळा
जिल्ह्यात १११ उमेदवारांना नियुक्ती
सिंधुदुर्गनगरी दिनांक ४ (जिमाका) :- राज्यातील कोणताही तरुण बेरोजगार राहू नये, प्रत्येकाच्या हातांना काम मिळाले पाहिजे, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार आहे. राज्य शासनाने आज दहा हजार पेक्षा अधिक पात्र उमेदवारांना नोकऱ्या देऊन ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. हा कार्यक्रम केवळ रोजगार वितरणाचा नसून, जनतेवरील शासनाच्या प्रेम, जबाबदारी आणि संवेदनशीलतेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी आज येथे केले.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस केलेल्या लिपिक-टंकलेखक पदावरील उमेदवारांना तसेच नवीन अनुकंपा धोरणानुसार निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उप वनसंरक्षक मिलिश शर्मा, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, पी.एम.विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. राणे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र गुंतवणुकीत देशात अग्रस्थानी आहे. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत आहे. शासन जनतेच्या हितासाठी अनेक उपक्रम राबवत असून, आज मिळालेली नोकरी ही शासनसेवेतून समाजसेवा करण्याची सुवर्णसंधी आहे.
पालकमंत्री श्री. राणे यांनी नव्याने नियुक्त झालेल्या युवकांना उद्देशून सांगितले, आपण आता प्रशासनाचा भाग झाला आहात. शासनाची सेवा हीच जनसेवा या भावनेने कार्य करा. राज्याच्या विकासासाठी आपले योगदान महत्त्वाचे आहे. राज्यातील उद्योगपती आणि गुंतवणूकदार महाराष्ट्राकडे विश्वासाने पाहत आहेत, ही बाब राज्यासाठी अभिमानास्पद आहे. सिंधुदुर्गचा पालकमंत्री म्हणून या रोजगार वितरण सोहळ्याला उपस्थित राहणे हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या राज्य शासन अनेक लोकाभिमुख निर्णय घेत असून यामुळे अनेकांना कल्याणकारी योजनांचा लाभ होत आहे. आज अनेक अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखक उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येत आहेत. या अंतर्गत जिल्ह्यामध्ये अनेक उमेदवारांना नियुक्ती मिळणार असल्याने जिल्हा प्रशासनाला देखील बळकटी मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजश्री सामंत यांनी तर आभार श्रीमती चैताली सावंत यांनी मानले.
अनुकंपा धोरणानुसार नियुक्ती-
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय -8, अधीक्षक अभियंता दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प – 2, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक – 1, सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय – 1, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय – 7, सावंतवाडी नगरपरिषद- 1, जिल्हा परिषद- 5.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्दारे लिपिक-टंकलेखक पदावरील नियुक्ती-
जिल्हाधिकारी कार्यालय (महसूल) – 37, जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा) – 18, सहायक आयुक्त कौशल्य विकास विभाग-1, महिला व बालविकास विभाग- 3, वैद्यकीय शिक्षण व आयुष – 1, राज्य उत्पादन शुल्क-1, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी- 8, नगर रचना- 1, उपवनसंरक्षक -6, पोलीस- 5, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण – 5.
००००००