Pune | Thu, 09 October 2025

Ad

अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे गतीने पूर्ण करा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

Sunil Goyal | 4 views
अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे गतीने पूर्ण करा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

छत्रपती संभाजीनगर, विमाका) दि.07 : विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, डीबीटीद्वारे नुकसान भरपाई वाटप, केरोसीन, धान्य वाटप, वाळु धोरण अंमलबजावणी व सेवा पंधरवाडा याबाबतचा आढावा घेतला. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे गतीने पूर्ण करा, शासनाने यापूर्वी वितरित केलेली मदत शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्याची कार्यवाही तत्परतेने करा, असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात दुरदृष्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी आज जिल्हानिहाय आढावा घेतला. यावेळी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दुरदृष्य प्रणालीद्वारे तर बैठकस्थळी अपर आयुक्त डॉ.अनंत गव्हाणे, अपर आयुक्त श्रीमती मंजुषा मिसकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री.पापळकर म्हणाले, नैसर्गिक आपत्तीत शेतकरी तसेच नुकसानग्रस्तांना वेळेत मदत मिळाली पाहिजे, यासाठी झालेल्या नुकसानीचे पंचनामे गतीने पूर्ण करावेत. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई डीबीटी प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार असल्याने याबाबतची कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करावी. शेती पिकांच्या नुकसानीसोबतच खरडून गेलेल्या जमिनीचे स्वतंत्र पंचनामे करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही पूर्ण करावी. ग्रामीण भागात रस्ते, पुल यासह ज्या विभागाच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे त्यांनी आराखडा तयार करून आपल्या विभागाच्या सचिवाकडे पाठवावा, असे निर्देश त्यांनी दिले.

नैसर्गिक आपत्तीत जिल्हानिहाय धान्य वाटपाचे नियोजनाचा त्यांनी आढावा घेत ही प्रक्रिया गतीमान करा, असे निर्देश श्री.पापळकर यांनी दिले. तसेच नविन वाळु धोरणाच्या अंमलबजावणीबाबत या बैठकीत चर्चा झाली. घरकुल व इतर शासकीय योजनांसाठी वाळुची उपलब्धता सुनिश्चित करावी असे निर्देश त्यांनी दिले.

सेवा पंधरवाडा या उपक्रमाचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अहवाल विहित कालमर्यादेत सादर करा, असे निर्देश श्री.पापळकर यांनी दिले.

ठळक बाबी

छत्रपती संभाजीनगर विभागात आतापर्यंत जून  ते ऑगस्ट 2025 या कालावधीतील 1668617.5 हे. जमीनीचे पंचनामे करण्‍यात आले असून 141896.80 लक्ष निधी सुध्‍दा प्राप्‍त झालेला आहे व निधी वितरणाची प्रक्रिया सुरू आहे त्‍यापैकी  217.42 कोटी  इतका निधी शेतकऱ्यांना वितरीत करण्‍यात आला आहे.

सप्‍टेंबरमध्‍ये झालेल्‍या पावसामुळे झालेल्‍या नुकसानीचे पंचनामे ७६ टक्‍के पूर्ण झाले असून, उर्वरित  पंचनाम्‍याचे काम गतीने सुरू आहे. सदर काम तात्‍काळ पूर्ण करण्‍याच्‍या सूचना विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी दिल्या.

धान्‍य वितरणाबाबत  33 हजार 43 बाधित कुटूंबाना धान्‍य वितरीत केले असून, उर्वरीत लोकांना सुध्‍दा धान्‍य वाटपाचे काम सुरू आहे.

सेवा पंधरवडा या उपक्रमामध्‍ये अतिवृष्‍टी व पावसामुळे जिल्‍हाधिका-यांना प्रभावीपणे काम करता आले नसले तरी पुढील १० दिवसांत सेवापंधरवाड्याचे उर्वरीत काम पूर्ण करण्‍याबाबत सूचनाही श्री. पापळकर यांनी दिल्‍या.

जिल्हानिहाय जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्या जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, मदत वाटपाची सद्यस्थिती याबाबत माहिती दिली.

***

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp