Pune | Thu, 09 October 2025

Ad

बोईसर रेल्वे स्थानकाजवळ भुयारी मार्ग उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करा – मंत्री गणेश नाईक

Sunil Goyal | 6 views
बोईसर रेल्वे स्थानकाजवळ भुयारी मार्ग उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करा – मंत्री गणेश नाईक

मुंबई, दि. ८: पालघर जिल्ह्यातील बोईसर रेल्वेस्थानकाजवळ उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने मार्ग काढावा. तसेच भुयारी मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी मिळण्यासाठी राज्य शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वन मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले.

बोईसर येथील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग फाटक बंद करून तेथे उड्डाणपूल व भुयारी मार्ग बांधण्यासंदर्भात वन मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, पालघर जिल्हाधिकारी इंदुमती जाखड, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे महाव्यवस्थापक विकास कुमार यांच्यासह, रेल्वे विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बोईसर रेल्वे स्थानक येथील लेव्हल क्रॉसिंग फाटक बंद करून रेल्वे उड्डाणपूल (आरओवी) उभारण्याबरोबरच भुयारी मार्ग बांधण्याची मागणी नागरिकांनी केली होती. उड्डाणपुलाचे आरेखन करताना तेथील काही आदिवासी पाड्यांना विस्थापित होत असल्याने नागरिकांचा त्याला विरोध होता. त्यामुळे नागरिकांची सोय पाहून उड्डाणपुलाचे सुधारित आरेखन तयार करण्याचे निर्देश वनमंत्री तथा पालकमंत्री नाईक यांनी यावेळी दिले.

तसेच या ठिकाणी भुयारी मार्ग बांधण्यासाठी 125 कोटी रुपये लागणार असून राज्य शासनामार्फत 62.50 कोटी निधीची आवश्यकता असल्याचे यावेळी निर्दशनास आणण्यात आले. यावर वन मंत्री नाईक यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांना दूरध्वनी करून भुयारीमार्गासाठी निधी देण्याची मागणी केली. मंत्री भोसले यांनी मंत्री नाईक यांची मागणी तत्वतः मान्य करून प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.

यावेळी बोईसर येथील नागरिकांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. खासदार सावरा व आमदार सर्वश्री तरे व गावित यांनीही नागरिकांच्या मागण्या लक्षात घेऊन रेल्वे उड्डाणपुलाचे आरेखन सुधारित करण्याची मागणी केली.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp