Pune | Thu, 09 October 2025

Ad

देहर्जे प्रकल्पबाधितांना भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी मलवाडा पॅटर्न तयार करा – मंत्री गणेश नाईक

Sunil Goyal | 6 views
देहर्जे प्रकल्पबाधितांना भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी मलवाडा पॅटर्न तयार करा – मंत्री गणेश नाईक

मुंबई, दि. ८ : पालघर जिल्ह्यातील देहर्जे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना मलवाडा येथील दराने भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी मलवाडा पॅटर्न तयार करून तसा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करण्याचे निर्देश वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले.

देहर्जे प्रकल्पबाधितांच्या भूसंपादनाच्या मोबदल्यासंदर्भात वन मंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, पालघर जिल्हाधिकारी इंदुमती जाखड यांच्यासह एमएमआरडीए, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालघर जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्यासाठी देहर्जे मध्यम प्रकल्प विक्रमगड तालुक्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी जांभे, साखरे व खुडेद या तीन गावातील 238 हेक्टर खासगी जमिन संपादित करावी लागणार आहे. परंतु या संपादनासाठी देण्यात येणारा मोबदला अपुरा असल्याने त्यावर तोडगा काढण्याची मागणी प्रकल्पबाधितांनी केली होती. परंतु या परिसरात गेल्या काही काळापासून जमिनीची खरेदी विक्री न झाल्याने मोबदला देण्यात येत नव्हता. त्यामुळे जवळच्या मलवाडा येथील जमिनीच्या बाजारभावानुसार मोबदला देण्याचा प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात वन मंत्री नाईक यांनी निर्देश दिले.

देहर्जे प्रकल्पबाधित हे आदिवासी असल्याने त्यांच्या जमिनींना योग्य भाव मिळावा, यासाठी मलवाडा येथील जमिनीच्या दराने भूसंपादनाचा मोबदला देण्यासंदर्भात मलवाडा पॅटर्न तयार करावा. त्यासाठी आवश्यक तो प्रस्ताव शासनस्तरावर पाठवावा. यावर शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे वन मंत्री नाईक यांनी यावेळी सांगितले. खासदार डॉ. सावरा, आमदार गावित यांनी प्रकल्प बाधितांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp