Pune | Fri, 10 October 2025

Ad

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

Sunil Goyal | 6 views
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नंदुरबार, दि. ४ ऑक्टोबर २०२५ (जिमाका): राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नंदुरबार तालुक्यातील चौपाळे पंचक्रोशीतील भागांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि शासनाकडून तातडीने दिवाळीपूर्वूी मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

पालकमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्हा अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. या अतिवृष्टीत पपई, केळी, कापूस तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू असून, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

ॲड. कोकाटे यांनी स्पष्ट केले की, “कुठल्याही विमा कंपनीचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी पिकविमा उतरवला आहे, त्या सर्वांना शासनाकडून मदत मिळणार आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, नंदुरबार तालुक्यात सुमारे २० किलोमीटर परिसरात मोठे नुकसान झाले असून प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे.

कृषी धोरणावर भाष्य करताना त्यांनी म्हटले की, “निसर्गासमोर टिकाव धरणारे कृषी धोरण राबवले पाहिजे. केळी आणि पपई सारख्या पिकांवर अतिवृष्टीचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे अशा परिस्थितीत नवीन दृष्टिकोनातून कृषी धोरणाचा विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी आपण शासन पातळीवर पाठपुरावा करणार आहोत.”

या पाहणी दौऱ्यात आमदार राजेश पाडवी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सी. के. ठाकरे महसूल, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
०००००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp